महामार्गावरील एकट्या प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक

कोरेगांव मुळ गावातून दुचाकीवरून जाणाऱ्या व्यावसायिक मुकेश सुरवसे यांना दोन अज्ञातांनी प्रयागधाम फाट्याजवळ अडवून लुटले होते. त्यांना कोयत्याचा धाक दाखवत मोबाईल व रोकड आणि दुचाकी देखील चोरून नेली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

    पुणे : महामार्गावरील एकट्या प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलीसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चाळीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वैभव राजाराम तरंगे (वय १९, रा. गोळीबार मैदान, भवरापुर) व राजेंद्र दत्तात्रय मुसळे (वय १९, रा. डांगे चौक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    कोरेगांव मुळ गावातून दुचाकीवरून जाणाऱ्या व्यावसायिक मुकेश सुरवसे यांना दोन अज्ञातांनी प्रयागधाम फाट्याजवळ अडवून लुटले होते. त्यांना कोयत्याचा धाक दाखवत मोबाईल व रोकड आणि दुचाकी देखील चोरून नेली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्यादरम्यान, पथकाला हा गुन्हा वैभव तरंगे व त्याच्या साथीदाराने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी आणि मोबाईल असा ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे व त्यांच्या पथकाने केली आहे.