पिंपरीत दोन लिपिक लाच घेताना अटक ; साडेआठ हजारांची लाच महागात

तक्रारदार यांच्या एका ग्राहकाच्या मिळकतीचे हस्तांतरण व कर पावतीच्या दुरुस्तीसाठी ते थेरगाव येथील 'ड' क्षेत्रीय कार्यालयात गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडे साडेआठ हजारांची लाच मागितली.याबाबत त्यांनी दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली होती.

    पिंपरी : कर पावतीमध्ये नावाची दुरुस्ती करण्यासाठी साडेआठ हजारांची लाच घेणाऱ्या महापालिकेच्या दोन लिपिकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. थेरगाव येथील महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

    प्रदीप शांताराम कोठावदे (वय ३९), हैबती विठ्ठल मोरे (वय ५१) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकांची नावे आहेत. याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाने तक्रार केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी थेरगाव येथील महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहेत. तर, तक्रारदार यांचा ‘रिअल इस्टेट’चा व्यवसाय असून ते फ्लॅट, शॉप, ऑफिस भाड्याने मिळवून देतात. तसेच, भाडे करारनामा, खरेदीखत, मिळकत हस्तांतरण यासारखी देखील कामे करतात.

    दरम्यान, तक्रारदार यांच्या एका ग्राहकाच्या मिळकतीचे हस्तांतरण व कर पावतीच्या दुरुस्तीसाठी ते थेरगाव येथील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडे साडेआठ हजारांची लाच मागितली.याबाबत त्यांनी दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार, लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करून शुक्रवारी सायंकाळी सापळा रचून आरोपींना साडेआठ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार तपास करीत आहेत.