धानोरेत दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

शिक्रापूर: शिरूर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित व्यक्तींच्या संख्येत वाढ होऊन काहींचा मृत्यू होत असताना आता शिरूर तालुक्यातील धानोरे येथील एका कोरोना बाधित वृद्धाचा तर सणसवाडी येथील एका कोरोना बाधित कोरोना बाधित एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

धानोरे (ता. शिरूर) येथे कोरोना वर अटकाव आणण्यासाठी ग्रामस्थ व नागरिकांना चार महिन्यांपासून यश आलेले असताना अचानक धानोरेमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊन येथील एका बड्या उद्योजकाला कोरोनाची बाधा झाल्याचे २६ जुलै रोजी समोर आले असताना आरोग्य विभागाच्या वतीने त्या उद्योजकाच्या घरातील नऊ व्यक्तींचे स्वॅब आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतलेले असताना त्या नऊ जणांपैकी चार जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह तर पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये सदर उद्योजकाचे वडील, भाऊ, भाऊजय व दोन लहान यांचा देखील कोरोना पॉझिटिव्ह मध्ये समावेश होता. या सर्वांवर पुणे येथे उपचार सुरु करण्यात आले होते. त्या पैकी सदर उद्योजकाच्या ७९ वर्षीय वडिलांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सणसवाडी एका कंपनी कामगाराला कोरोनाची बाधा झाल्याचे ३० जुलै रोजी समोर आले असताना आरोग्य विभागाने त्याच्या कंपनी कामगाराच्या घरातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असताना २ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरातील दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर देखील वाघोली येथे उपचार सुरु करण्यात आले असताना आज सणसवाडी येथील ८० वर्षीय जेष्ठ महिलेचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची घटना घडली असून आरोग्य विभागाच्या वतीने सदर व्यक्तींच्या घराच्या जवळील परिसरात फवारणी करत योग्य खबरदारी घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.