प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

    पुणे : लष्कर परिसरात ट्रस्टच्या केसमधून दोन दाम्पत्यांमध्ये वाद होऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    याप्रकरणी कदीर मेमन (वय ५८) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदीर मेमन यांच्या तक्रारीनुसार ते पत्नीसह त्यांच्या दुकानाजवळ बसले होते. यावेळी आरोपी हे येथे आले. त्यांनी ‘तू शेखभाई यांच्यावर ट्रस्टबाबत केलेली केस मागे घे’. तसेच, तू मला जेलमध्ये पाठविले आहे. तुला सोडणार नाही, असे म्हणत वाद घालून त्यांना शिवीगाळ केली.

    तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. तर, २८ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांच्या पती व मुलांसह दुचाकीवरून जात असताना कदीर मेमन याच्या दुकानासमोर आल्यानंतर आरोपींनी त्यांना बोलावून घेतले. त्यांना तीन वर्षांपूर्वी केलेली केस मागे घेण्यास सांगितले. तक्रारदार यांच्या पतीने नकार दिल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपयांची साखळी चोरून नेली. अधिक तपास लष्कर पोलीस करत आहेत.