पिंगोरी येथे जंगली जनावराच्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार

    नीरा : पिंगोरी ता. पुरंदरे येथे मंगळवारी (दि.28) जंगली जनावराने केलेल्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार झाल्या. वन विभागाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी याबाबत पंचनामा करण्यात आला आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शीनी दिलेली माहिती अशी की, पिंगोरी येथील पाझर तलावाच्या बाजूला भारती अरुण यादव या शेळ्या वा मेंढ्या चरावयास घेऊन गेल्या होत्या.

    दुपारी तीन वाजता यातील काही मेंढ्या डोंगराच्या वघळीला आड बाजूला चरत होत्या. तेव्हा आड बाजूला मेंढ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने भारती यादव तिकडे गेल्या. त्यावेळी एक जंगली जनावर मेंढी घेऊन जाताना त्यांनी पाहिले. त्या घाबरून तिथून माघारी पळत आल्या. त्यानंतर आसपासच्या शेतातील लोकांना त्यांनी बोलून घेतले व पुन्हा त्या ठिकाणी गेल्या असता त्यांना त्या ठिकाणी एक मेंढी मृत अवस्थेत आढळून आली तर एक मेंढी त्या प्राण्याने नेली होती.

    अशाप्रकारे या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार झाल्या. यानंतर त्यांनी याबाबतची माहिती यादव यानी पोलीस पाटील राहुल शिंदे यांना कळवली. पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी याबाबतची माहिती वनपाल पाचर्णे यांना दिली. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली व मृत मेंढींचा पंचनामा करून नुकसान भरपाईच्या मागणीसाठी पाठवला आहे. वन विभागाच्या वतीने हा हल्ला लांडग्यांनी केला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.