अवकाळीचा भात शेतीला फटका; मावळच्या पूर्व पट्ट्यात जोरदार तडाखा

    तळेगाव दाभाडे : ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही शेतकर्‍यांचे कापून ठेवलेले भात पीक भिजून नुकसान झाले. तसेच भात खाचरात पाणी साचल्याने रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    गेल्या आठवड्यातील गुरुवार, शुक्रवारी परतीच्या पावसाने मावळ तालुक्यात पूर्व पट्ट्यात जोरदार तडाखा दिला. त्यामुळे खरीप भात पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

    शेतकऱ्यांचे नुकसान

    यावर्षी मावळातील खरीप भात पीक अतिशय चांगले झाले होते. एकूण १३ हजार हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवड झालेल्या होत्या. दमदार पावसामुळे भात पीक चांगले आले होते. शेतकरीही आनंदी होते. मात्र अखेरच्या टप्प्यात काही भागात परतीच्या पावसाने मात्र जोरदार तडाखा दिल्यामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

    भात कापणीला फटका

    भात कापणीच्या अखेरच्या टप्प्यात अवकाळी पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांनी दिवाळीचा सण बाजूला ठेवून प्रथम कापणीवर लक्ष केंद्रित केले होते. तरीही अवकाळी पावसाचा भात कापणीला फटका बसल्याने शेतकरी नाराज असल्याचे दिसून येत आहे.

    खरीप भात काढणी झाल्यावर शेतकरी शेतात

    रब्बी हरभरा, गहू, वाटाणा, मसूर या पिकांच्या पेरण्या करतात. या वर्षी भात कापणीच्या वेळी पाऊस पडल्याने भात खाचरांमध्ये पाणी साठले. त्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    – भरत शिंदे, शेतकरी, शिवणे.