पुण्यात १८ वर्षांवरील लसीकरण व्यापक स्वरूपात करणार : महापौर मोहोळ

- आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लस , ५३ केंद्रांवर ५३०० जणांना मिळणार लस

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आखलेल्या नव्या लसीकरण धोरणानुसार पुणे मनपा मनपा हद्दीत कोरोना लसीकरण सुरु करण्यात येत असून लसीकरणाची ही मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. यासाठी पुणे महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज आहे, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

    केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या लसीकरण धोरणानुसार पुणे महापालिका हद्दीतही लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. याच संदर्भातील माहिती महापौर मोहोळ यांनी दिली. त्यावेळी ते बोलत होते.महापौर मोहोळ म्हणाले, १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण होणे, हा आपल्या पुणे शहरासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. पुणे शहर लसीकरणाबाबतीत आघाडीवर तर आहेच, मात्र नव्या लसीकरण धोरणामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळेल. शहरातील १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या आणि व्यापकता लक्षात घेऊन महापालिकेने लसीकरणाचे नियोजन केले आहे’.

    १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘पहिल्या दिवशी आपण ५३ केंद्रांवर लसीकरण करत असून प्रत्येक केंद्रांवर १०० कोविशील्ड लस उपलब्ध करुन दिल्या आहेत. प्रत्येक केंद्रांवर ७० टक्के डोस हे ऑनलाईन अपॉईंटमेंट बुकिंग केलेल्या नागरिकांना तर ३० टक्के डोस हे ऑन स्पॉट नोंदणी करुन उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाईन नोंदणी बुधवारी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे’.