वडेट्टीवारांची प्रवृत्ती ओबीसींसाठी हानीकारक; आरक्षण जायला वडेट्टीवारही कारणीभूत; धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांची टीका

स्वत:चे नेतृत्व पुढे आणण्यासाठी ते ओबीसींच्या नेत्यांचे खच्चीकरणही करत आहेत. चार महिन्यांपुर्वी सांगलीत ओबीसींच्या मोर्चाची घोषणा झाली होती. त्यावेळी वडेट्टीवारांनीच त्या मोर्चात एकमत होऊ दिले नाही. धनगर समाजातील माजी आमदाराला एकटे पाडून दोन मोर्चे निघण्याची तयारी तिथे करण्यात आली होती. मात्र कोरोना निर्बंधांमुळे मोर्चे झाली नाहीत, मात्र त्यावेळीच वडेट्टीवारांचा खरा चेहरा उघड झाला .

  पुणे: राज्याचे मदत, पुनर्वसन व ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवर हे ओबीसींचा उपयोग स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी करत आहेत. ओबीसी कल्याणाचे काम सोडून ते जातींजातींत तणाव वाढवत आहेत. त्यांची मग्रुर, उथळ प्रवृत्ती ओबीसींसाठी हानीकारक आहे. त्यांनी तेढ वाढविण्याचे काम न थांबवल्यास ओबीसींचे आणखी नुकसान होईल, असा इशारा देत ओबीसींचे आरक्षण जायला मंत्री वडेट्टीवारांची अकार्यक्षमताही कारणीभूत असल्याचा आरोप धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केला आहे.

  वडेट्टीवार हे या आठ- दहा महिन्यांत ओबीसी नेते म्हणून स्वतःचा गाजावाजा करत आहेत. मंडल आयोगाला कडवा विरोध करणाऱ्या शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या वडेट्टीवारांनी आजवर ओबीसींसाठी काय काम केले, हेही महाराष्ट्राला माहिती नाही. त्यांच्याकडे ओबीसी कल्याणाचे मंत्रीपद असताना ते सातत्याने प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या मराठा समाजाविरोधात टीकाटिप्पण्णी करत आहेत. त्याचा परिणाम म्हणून एनटी सी, एन डी तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भाने १९९४ मध्ये घेतलेल्या शासन निर्णयांविरोधात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे धनगर, वंजारी समाजासह ओबीसी समाजाला आहे ते आरक्षण टिकविण्यासासाठी भविष्यात न्यायालयीन लढाई लढावी लागू शकते. मंत्र्यांचे काम शांततेने मार्ग काढणे असते, मात्र वडेट्टीवार सातत्याने जातीय संघर्ष पेटविण्याचे काम करत आहेत, हे धक्कादायक आहे.

  सद्या राज्यात गाजत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणाबाबतीत या वडेट्टीवारांनी काय दिवे लावले आहेत? वडेट्टीवार हे ओबींसीचे मंत्री झाल्यापासून त्यांनी याप्रश्नावर काय काम केले, हे त्यांनी जाहीर करावे. त्यांचे लक्ष ओबीसी कल्याणावर असतेतर त्यांनी मंत्री झाल्यावर लगेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली असती, मात्र वडेट्टीवारांचे ओबीसींपेक्षा स्वकल्याणाकडे लक्ष आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते मुदत, पुनर्वसन खाते मिळण्यासाठी काही दिवस रूसून बसले होते. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळविण्यासाठी लॉबिंग करत होते. आता मराठा- ओबीसी वादाला खतपाणी घालत आहेत. ओबीसी आरक्षणाचा विषय हा फडणवीस सरकारपासून सुरू आहे, त्याबाबत वडेट्टीवारांनी या सरकारमधील मंत्री म्हणून काम करायला पाहिजे होते, मात्र त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण जाण्याला फडणवीस सरकार बरोबरच हे ठाकरे सरकार आणि मंत्री वडेट्टीवार हे तितकेच जबाबदार आहेत. त्यांनी हे आरक्षण वाचवण्यासाठी काम केले नाही, त्यामुळे ते ओबीसी मंत्री म्हणून काम करण्यासही लायक नाहीत.

  वडेट्टीवारांनी लोणावळा येथील ओबीसींच्या शिबीरात दोन विधाने केली आहेत, त्यावरून त्यांची मूळ मग्रूर, उथळ प्रवृत्ती चव्हाट्यावर आली आहे. वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो, असे वडेट्टीवारांनी म्हटले आहे. याचा अर्थ ओबीसी आरक्षण घालवण्याच इशारा वडेट्टीवारांनी केला होता कां?, असाही निघतो. वाघ यांच्या म्हणण्याप्रमाणे चालतो तर यांना मग रूसून कां बसावे लागते, हाही प्रश्न उरतोच. ओबीसी असल्याने मला महसूलमंत्रीपद मिळाले नाही, हे त्यांचे दुसरे विधान आहे. यावरून त्यांना ओबीसींची व्होटबँक दाखवून मोठी मंत्रीपदे पदरात पाडून घ्यायची आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. कर्तृत्व नसताना त्यांना मोठमोठी पदे मात्र हवी आहेत, हेही आता सर्वांना कळाले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. राज्य मागासवर्ग आयोगाकडून गोळा केला जाणारा इम्पेरिकल डेटा सुप्रिम कोर्टात मान्य व्हायला पाहिजे, इतका तो दर्जेदार हवा, मात्र वडेट्टीवारांनी राज्य मागासवर्ग आयोगावर नेमलेल्या व्यक्ती किती तज्ज्ञ आहेत, याबाबतही शंका पुढे आल्या आहेत. त्यामुळे वडेट्टीवारांनी मोठे बोलण्यापेक्षा अधित काम करून दाखवावे. त्यांच्या वादग्रस्त विधाने करण्याचा छंदात सुप्रिम कोर्टात ओबींसींना पुन्हा यश मिळणे अवघड होऊन जाईल, असा इशाराही ढोणे यांनी दिला आहे.

  सांगली मोर्चातील फुटीमागे वडेट्टीवारच

  लोणवळा येथील शिबीरात ओबीसींच्या नेत्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केल्याचे वडेट्टीवारांनी दाखवले असलेतरी, त्यांचा तो खरा चेहरा नाही. स्वत:चे नेतृत्व पुढे आणण्यासाठी ते ओबीसींच्या नेत्यांचे खच्चीकरणही करत आहेत. चार महिन्यांपुर्वी सांगलीत ओबीसींच्या मोर्चाची घोषणा झाली होती. त्यावेळी वडेट्टीवारांनीच त्या मोर्चात एकमत होऊ दिले नाही. धनगर समाजातील माजी आमदाराला एकटे पाडून दोन मोर्चे निघण्याची तयारी तिथे करण्यात आली होती. मात्र कोरोना निर्बंधांमुळे मोर्चे झाली नाहीत, मात्र त्यावेळीच वडेट्टीवारांचा खरा चेहरा उघड झाला, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.