वाहन चोरांचा पिंपरीत सुळसुळाट ; एकाच दिवशी वाहन चोरीचे ११ गुन्ह्यांची नोंद

जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत तब्बल ४४५ दुचाकी वाहने चोरीला गेली. केवळ ६८ वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. हे प्रमाण केवळ १५ टक्के एवढे आहे. मागील वर्षी जानेवारी ते मे २०२० या कालावधीत शहरातून २७० दुचाकी वाहने चोरीला गेली होती. त्यातील ५४ वाहने पोलिसांनी शोधली होती. ते प्रमाण २० टक्के एवढे होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. त्याच बरोबर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे.

    पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दिवसाढवळ्या वाहने चोरून नेत आहेत. पिंपरी – चिंचवड शहरात नुकतेच एका दिवसात तब्बल दहा दुचाकी तर एक रिक्षा चोरीस असे एकूण अकरा गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या सर्व घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे तीन लाखांची वाहने चोरून नेली आहेत. यातील एक घटना मे महिन्यातील आहे. तर इतर घटना मागील आठवडा भरातील आहेत.

    निगडी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक दुचाकी चोरट्यांनी थरमॅक्स कंपनीच्या गेट समोरून तर एक दुचाकी आंबेडकर वसाहत निगडी येथून घराच्या पार्किंगमधून चोरून नेली. चाकण पोलीस ठाण्यात देखील वाहन चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका गुन्ह्यात चोरट्यांनी जेबीएम कंपनी समोरून दुचाकी चोरून नेली आहे. तर दुसरी घटना भामचंद्र विद्यालय भांबोली येथे घडली आहे. विद्यालया समोरून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. चाकणमधील दोन्ही प्रकार भर दिवसा घडले आहेत.

    भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दोन्ही गुन्हे दुचाकी चोरीचे आहेत. चोरट्यांनी घराच्या पार्किंगमधून या दुचाकी चोरून नेल्या आहेत.चिखली पोलीस ठाण्यात एक दुचाकी चोरी तर एक रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल आहे. ही दोन्ही वाहने चोरट्यांनी घरासमोरुन चोरून नेली आहेत. तळेगाव दाभाडे येथे जनरल हॉस्पिटल समोरून दुचाकी चोरून नेली आहे.तर सोमाटणे येथून एक दुचाकी चोरीला गेली आहे.पिंपरी पोलीस ठाण्यात देखील एक मोपेड दुचाकी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही दुचाकी घरासमोरून चोरून नेली आहे.

    चोरीच्या वाहनांचा छडा लागेना

    वाहन चोरटे प्रामुख्याने दुचाकी वाहनांना टार्गेट करत आहेत. मे महिन्यात पिंपरी – चिंचवड शहरातून ९६ दुचाकी चोरीला गेल्या. त्यातील केवळ १५ दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.तसेच चार तीन चाकी वाहने चोरीला गेली.त्यातील दोन वाहने पोलिसांनी शोधली आहेत. मे महिन्यात चार कार चोरीला गेल्या.त्यातील एक कार पोलिसांना मिळाली आहे. जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत तब्बल ४४५ दुचाकी वाहने चोरीला गेली. केवळ ६८ वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. हे प्रमाण केवळ १५ टक्के एवढे आहे. मागील वर्षी जानेवारी ते मे २०२० या कालावधीत शहरातून २७० दुचाकी वाहने चोरीला गेली होती. त्यातील ५४ वाहने पोलिसांनी शोधली होती. ते प्रमाण २० टक्के एवढे होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. त्याच बरोबर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे.