लहान मुलांच्या लसीचे पुढं काय झालं? पत्रकारांच्या प्रश्नावर अदर पुनावाला म्हणतात

“लहान मुलांसाठी सिरमच्या कोवावॅक्स लसीच्या चाचण्या अगदी सुरळीतपणे सुरू आहेत. जर सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये लहान मुलांसाठी लस येईल”

    कोरोनावर COVID-19 आता लवकरच आणखी एक नवीन लस vaccine मिळणार आहे. ‘कोवोवॅक्स’ ही लस (Kovovax vaccine) ऑक्टोबरमध्ये प्रौढासाठी लाँच करण्यात येईल. तर लहान मुलांसाठी ही लस पुढच्या वर्षी म्हणजे २०२२ च्या पहिल्या तिमाहित येईल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ Serum Institute of India अदर पुनावाला Adar Poonawalla यांनी दिली. शुक्रवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये अदर पूनावाला यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

    या पत्रकार परिषदेत बोलताना अदर पुनावाला म्हणाले की, “लहान मुलांसाठी सिरमच्या कोवावॅक्स लसीच्या चाचण्या अगदी सुरळीतपणे सुरू आहेत. जर सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये लहान मुलांसाठी लस येईल”, असं अदर पूनावाला म्हणाले आहेत. “अनेक स्वयंसेवकांना तपासण्यांसाठी लसीचे डोस देण्यात आले आहेत. चाचण्या व्यवस्थित सुरू आहेत. या वर्षाखेरीसपर्यंत या चाचण्यांचा आढावा घेतला जाईल.”

    लसीची सुरक्षीतता तपासण्यासाठी वेळ लागेल

    अदर पूनावाला चाचण्यांच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना म्हणाले, लहान मुलांसाठी ही लस किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आम्हाला किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागेल. टप्प्याटप्प्याने यावर आम्ही काम करत आहोत. १२ वर्षांच्या खालील मुलांचा देखील चाचण्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सर्व पालकांना त्यांची मुले सुरक्षित हवी आहेत. आम्हाला याचा विश्वास वाटतोय की कोवाव्हॅक्सला पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत मंजुरी मिळालेली असेल. मात्र, जेव्हा डीसीजीआयला हे करणे योग्य वाटेल, तेव्हाच हे घडू शकेल.

    दरम्यान, १७ सप्टेंबर अर्थात शुक्रवारी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुमारे अडीच कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून कौतुक होत असताना दुसरीकडे अद्याप लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस आलेली नसल्यामुळे १८ वर्षांखालील वयोगटातील मुला-मुलींसाठी अजूनही लसीची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.