सुप्रियाताई, वरवंडला दुसरी भुयारी होणार तरी कधी?; ग्रामस्थांचा सवाल

    वरवंड / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दिवसेंदिवस वाढत्या वाहतुकीमुळे वरवंड येथील उड्डाणपूलाची अरुंद मोरी वाहतुकीसाठी अपुरी पडत असल्याने; या ठिकाणी दुसऱ्या पर्यायी मोरीची गरज निर्माण झाली आहे. मात्र, गावच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा व गंभीर विषय बनलेला असताना; दुसरी मोरी बनविण्याचे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले होते. याचा त्यांना विसर पडला की काय असे म्हणण्याची ग्रामस्थांवर वेळ आली आहे.

    मागील झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वरवंड येथे झालेल्या सांगता सभेत सुप्रिया सुळे यांनी वरवंड येथील उड्डाणपुलाची पर्यायी दुसरी मोरी करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काही दिवसांचा कालावधी होऊन गेला तरी, येथील पर्यायी मोरीचे काम अद्यापही झालेले नाही. यामुळे हे आश्वासन कधी पूर्ण होणार का आणि सुप्रिया सुळे या दिलेला शब्द पाळतील का? असा सवाल व्यक्त केला जात आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी वरवंड गाव पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत गेले आहे. यामुळे भविष्यात गावात येणारी वाढती वाहतुक दळणवळणाच्या दृष्टीने फायद्याची असली तरी येथील अरुंद मोरी अडचणीची ठरत आहे.

    गावात हडपसर-वरवंड अशी पीएमपीएल ची बससेवा सुरू झाली आहे. मात्र, भविष्याच्या दृष्टीने रस्ते विकास प्राधिकरणाने महामार्गवरील इतर गावांप्रमाणे वरवंड येथे डबल मोरी का बनवली नाही. यावेळी गाव पुढारी का गप्प बसले. यामुळे आजही या अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाचे उत्तर कशात लपले आहे. हे पुन्हा शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.