डाटा गोळा करणे ही राज्याची जबाबदारी भुजबळ यांच्यावर नेमका कोणाचा दबाव आहे? सर्वपक्षीय नेत्यांच्या जुगबंदीने शिबीर गाजले!

लोणावळा येथील इतर मागासवर्गीयांच्या सर्वपक्षीय चिंतन शिबीरात ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी बावनकुळे यांच्या प्रश्नाना प्रत्युत्र देण्याचा प्रयत्न केल्याने भाजप विरुध्द कॉंग्रेस असा सामना रंगल्याच चित्र होते.

  लोणावळा: ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होणे ही इतिहासातील काळी घटना असल्याचे भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. डाटा गोळा करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, ते करत नाहीत. त्यामुळे भुजबळ यांच्यावर नेमका कोणाचा दबाव आहे? असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला. लोणावळा येथील इतर मागासवर्गीयांच्या सर्वपक्षीय चिंतन शिबीरात ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी बावनकुळे यांच्या प्रश्नाना प्रत्युत्र देण्याचा प्रयत्न केल्याने भाजप विरुध्द कॉंग्रेस असा सामना रंगल्याच चित्र होते.

  भुजबळ यांनी या वयात खोटे का बोलावे
  २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आले, ३१ जुलैला वटहुकूम काढला, तो वटहुकूम रद्द होऊ देणार नाही असे आश्वासन भुजबळांनी दिले. मात्र, ते या ठिकाणी येऊन तो वटहुकूम रद्द करा म्हणाले त्यावेळी मला वाईट वाटले. भुजबळ यांना याही वयात खोटे का बोलावे लागले असा सवाल बवनकुळे यांनी केला. ते म्हणाले की, आम्ही अंत:करणाने इथे आलो आहोत,  देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला जायला सांगितले आणि राज्य सरकारला मदत करायला सांगितले. आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. राज्य सरकारला ३-४ महिने डाटा तयार करायला लागतील, दुसरीकडे केंद्र सरकारकडून डाटा मिळेल का यासाठी प्रयत्न करावेत, राज्य आयोगाचे पत्र घेऊन उद्याच न्यायालयात जावे तसेच सध्या कोव्हिड आहे यामुळे निवडणुका ५-६ महिने पुढे ढकला असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

  मोदींनी सुधारणा केली तर कागदपत्र आणा
  विधानसभा अध्यक्ष पटोले यानी ओबीसी जनगणना करावी असा ठराव विधानसभागृहात आणला. वास्तविक जनगणना राष्ट्रीय पातळीवर केली जाते. पण ग्रामविकास स्तरावर जनगणना होऊ शकते असे बावनकुळे म्हणाले, त्यावर मोदींनी अशी सुधारणा केली असेल तर तशी कागदपत्र आणा असे नाना पटोले यांनी सुनावले. आता कोरोनामुळे घरोघरी जाऊन जनगणना करणे अशक्य असल्याचे पटोले यांनी म्हटले.

  संविधानापेक्षा काही जण स्वतःला मोठे समजतात
  देवेंद्र फडवणीस यांचे भाषण ऐकले. सत्ता द्या आरक्षण आणून देतो असे म्हटले मग हे कोठून आरक्षण आणणार? असा सवालही नाना पटोलेंनी विचारला.  ते म्हणाले की, संविधानापेक्षा काही जण स्वतः मोठे समजत असेल तर ते चुकीचे आहे, त्यामुळे या समस्या उदभवत आहेत, बावनकुळे यांना तिकीट मिळाले नाही याचे ओबीसी समाजाला दुःख आहे, ज्याने ही गाडी फिरवली त्याला शुभेच्छा, त्यानिमित्त ओबीसी एकत्रित आलो, हे शुभ संकेत आहेत, आता यापुढे सगळे एकत्रित राहायला हव असेही नाना पटोले यांनी सांगितले.