सणसरच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य देणार : सरपंच रणजितसिंह निंबाळकर

  इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सणसर हे एक मोठे गाव म्हणून ओळखले जाते. गावची लोकसंख्या जवळपास २० ते २२ हजार आहे. हे गाव राजकीय, सामाजिक या सर्वच गोष्टींमध्ये एक महत्वपूर्ण गाव म्हणून ओळखले जाते. तालुक्याचा आमदार हा हे गाव ठरवतो, असेही म्हटले जाते. यामुळे या गावाकडे सर्वांचे लक्ष असते. सणसरच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य देणार, तिसरी लाटही रोखणार, असा निर्धार सरपंच रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केला.

  पुरात उध्वस्त झालेले गाव सुशोभित करणार

  निंबाळकर म्हणाले, गावात गेल्यावर्षी आलेल्या पुरामध्ये अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. यामुळे रोड, वॉल कंपाउंड, सभा मंडप, गटार लाईन, बाजार ओटा, याची कामे सुरू केली आहेत. यासाठी १५ व्या वित्त आयोगातून पैसे मंजूर केले आहेत. पाण्याच्या टाक्या यामधून संपूर्ण गावासाठी आणि वस्त्यांमध्ये पाणी मिळणार आहे. सिमेंटच्या रस्त्याचे मोठे नुकसान यामध्ये झाले यामुळे ही कामे नुकतीच हाती घेण्यात आली आहे. गावात मोठे सौरदिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे संपूर्ण गाव प्रकाशमय झाले आहे. या पुरात घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांना देखील मदत करण्याचे काम सुरू आहे.

  दुसरी लाट थोपवून धरली, आज गाव आहे कोरोनामुक्त

  कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती, मात्र सणसरच्या आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले. ज्या दिवशी लस उपलब्ध असेल त्या दिवशी सकाळीच ग्रामस्थांच्या मोबाईलवर मेसेज पाठवले जात होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले. याचा परिणाम म्हणजे दुसऱ्या लाटेत गावात फक्त हातावर मोजण्या पुरते रुग्ण आढळून येत होते. आज गावात एकही कोरोना रुग्ण नाही. सुरुवातीला लस घेण्यासाठी अनेकजण पुढे येत नव्हते. मात्र गावात लसीचे फायदे सांगून अनेकांना लस घेण्यास भाग पाडले. सुरुवातीला लस उपलब्ध असताना येईल त्याला लस देण्याचे काम आरोग्य केंद्रात करण्यात आले. याचा परिणाम लगेच दिसू लागला. यामुळे आज गावात एकही कोरोना रुग्ण नाही. लस आली की लगेच मेसेजद्वारे गावात माहिती देऊन लसीकरण करुन घेतले जाते.

  तिसरी लाट आलीच तर पूर्वतयारी

  सरपंच रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, तिसरी लाट येईल असे सांगितले जात आहे, या पार्श्वभूमीवर अजूनही क्वारंटाईन सेंटर सुरूच ठेवली आहेत. लसीकरण वाढवले जात आहे. तसेच आरोग्य केंद्राद्वारे सूचना देण्यात येत आहेत. सॅनिटायझर फवारणी केली जात आहे. तसेच एक ॲम्बुलन्स खरेदी केली आहे. तिसरी लाट आलीच तर ती रोखण्यासाठी त्याची पूर्वतयारी केली गेली आहे. मात्र लसीकरण झाल्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका कमी आहे. अजूनही शासनाने दिलेले नियम गावात अमलात आणले जातात. असेही त्यांनी सांगितले.

  भविष्यात महत्वकांक्षी योजना राबणार

  गावात आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या शाळा, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी सोलर बसवणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. यामुळे लाईट वाचणार आहे. प्रत्येक वाड्या वस्तीवर पाण्याची सोय करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सध्या ही सर्व कामे सुरू असून गावासाठी जास्तीक जास्त निधी कसा येइल यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही निंबाळकर म्हणाले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणावर निधी आणला जात आहे. गावात संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असते. त्या पाळखी ओट्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे वारकऱ्यांची देखील गैरसोय होणार नाही. सर्वांना सोबत घेऊन पुढील काळात देखील गावचा कायापालट करणार असल्याचे देखील निंबाळकर यांनी सांगितले आहे.

  गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, अंगणवाडी मंदिरे यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार असून याबाबत आराखडा तयार आहे. यामुळे विजेची मोठी बचत होणार आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन गावासाठी शासनाच्या सर्व योजना राबवणार आहे. गावाच्या कारभारात सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. महत्वपूर्ण घरकूलच्या योजनेचा लाभ सर्व लाभधारकाना मिळवून देणार आहे.

  – रणजितसिंह निंबाळकर, सरपंच, सणसर

  (शब्दांकन- ओंकार निंबाळकर)