सोबत आलात तर तुमच्यासोबत किंवा तुमच्याशिवाय; राष्ट्रवादी आणि काँग्रेसला संजय राऊत यांनी सुनावलं

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भोसरीतील गोविंद गार्डन कार्यालयात सुरु असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना अप्रत्यक्ष इशारा देत कार्यकर्त्यांना एकटं लढण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी राऊत यांनी चौफेर टोलाबाजी केली.

    पिंपरी : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भोसरीतील गोविंद गार्डन कार्यालयात सुरु असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना अप्रत्यक्ष इशारा देत कार्यकर्त्यांना एकटं लढण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी राऊत यांनी चौफेर टोलाबाजी केली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांचाही समाचार घेतला. शिवाय पालकमंत्री अजित पवार यांच्या दराऱ्याला घाबरु नका, असेही कार्यकर्त्यांना सांगितलं. सोबत आलात तर तुमच्यासोबत किंवा तुमच्याशिवाय, असं अप्रत्यक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना राऊत यांनी सुनावलं आहे.

    शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पिंपरी चिंचवडला जाऊन राष्ट्रवादीला डिवचण्याचं काम केलं. पुणे जिल्ह्यात आपलं कोणी ऐकत नाही असं काही सांगतात. असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका. नाही तर मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला, असं जाहीर विधान केल्यानंतर राऊत यांनी लगेच सारवासारव करण्यास सुरुवात केली. बघा चुकीचं ऐकू नका. माझं पूर्ण ऐका. चुकीचं लिहू नका. नाही तर लगेच ब्रेकिंग सुरू झालं असेल. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या आपल्यालाही दिल्लीवर राज्य करायचं आहे. दिल्लीत कोणतं ऑफिस कुठे आहे, पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत, अशी सारवासारवही त्यांनी केली.

    दिल्लीमध्ये मी राहतो. लोकांना मी पत्ता सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासमोर राहतात. त्यामुळे लोक मलाही ओळखतात. ही शिवसेनेची ताकद आहे, असं ते म्हणाले. आता भोसरीमध्ये मेळावा सुरू आहे. स्टेजवर मोठी गर्दी जमली आहे. मात्र, भोसरी भागात एकही नगरसेवक आपला निवडणून आला नाही ही खंत आहे. या स्टेजवर बसलेल्यांनी प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून आणले तरी महापालिकेत आपली सत्ता येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आपलाच महापौर होईल. त्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन राऊत यांनी केलं. महाराष्ट्रातील सत्ता आपली आहे. नुसतं पद आहे म्हणून नाही तर शिवसैनीकच्या मनगटात ताकद आहे म्हणून आपली सत्ता आहे, असंही ते म्हणाले.

    आगमी काळातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या. पिंपरी चिंचवडमध्ये कोणाचे कितीही नगरसेवक आले तरी नगरसेवक सेनेचाच झाला पाहिजे, त्यासाठी तयारी करण्याचे आवाहन केलं. महापालिका आली की आपल्या फुग्यातील हवा का जाते? असा सवालही संजय राऊत यांचा शिवसैनिकांना विचारला. शिरूर लोकसभा आणि पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी भोसरीतील गोविंद गार्डन कार्यालयात झाला. पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहीर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, राज्य संघटक गोविंद घोळवे उपस्थित होते.