‘मी जीवनाला कंटाळलो…’; व्हॉट्सऍप स्टेट्स ठेवत तरुणाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

दीपकने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्याच्या मोबाईलमध्ये आत्महत्या करत असल्याबाबतचे स्टेट्स ठेवले होते. तसेच काही नातेवाईकांना मी जीवनाला कंटाळलो असून मी आत्महत्या करणार असल्याचे मेसेज केल्याचे देखील समोर आले आहे.

    शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीत उडी मारून दीपक जितेंद्र रायपुरे या युवकाने आत्महत्या (Youth Committed Suicide) केल्याची खळबळजनक घटना घडली. अग्निशमन दलातील जवानांच्या अथक प्रयत्नानंतर या युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे.

    कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीच्या पाण्यामध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास विजयस्तंभाच्या पाठीमागील बाजूने दीपक रायपूरे (वय १९, रा. पेरणेफाटा ता. हवेली जि. पुणे) या युवकाने नदीत उडी मारल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यांनी आरडाओरडा केला तर काही नागरिकांनी युवकाचा पाण्यामध्ये शोध घेतला. मात्र, जलपर्णीमुळे अडचणी येत होत्या.

    या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक मोनिका बधे, पोलीस शिपाई अमित जाधव, प्रशांत धुमाळ, भुजबळ यांच्यासह अनेकांनी धाव घेतली.

    जीवनाला कंटाळलोय…

    दीपकने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्याच्या मोबाईलमध्ये आत्महत्या करत असल्याबाबतचे स्टेट्स ठेवले होते. तसेच काही नातेवाईकांना ‘मी जीवनाला कंटाळलो असून, मी आत्महत्या करणार’ असल्याचे मेसेज केल्याचे देखील समोर आले आहे. तर लोणीकंद पोलिसांनी याबाबत पंचनामा केला असून, रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.