५ कोटीच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण ; बारामती पोलिसांकडून १२ तासात टोळीचा पर्दाफाश

अपहरण करण्यापुर्वी आरोपींनी पुण्यातून ओला उबेरची कार भाड्याने घेतली, सोमेश्वरनगर येथे दर्शनासाठी जायचे असल्याचे कारचालकाला सांगितले .यानंतर कारचालक संतोष कुडवे मोगराळे घाटात सोडून त्याचा मोबाईल आरोपींनी तो पळून जाऊ नये, यासाठी त्याच्या वाॅचवर एकजण ठेवून आरोपी बारामतीला येऊन कृष्णराज याचे अपहरण केले

  बारामती : पिंपळी -लिमटेक येथील कृष्णराज ऊर्फ धनाजी जाचक या युवकाचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणा-या टोळीचा बारामती पोलिसांनी १२ तासात पर्दाफाश करून कृष्णराज याची सातारा जिल्ह्यातील मलवडी (ता. माण) येथील दरी खो-यातून आरोपींच्या ताब्यातून सुखरुप सुटका करण्यात यश मिळविले ,तर या टोळीतील दोघा आरोपींना ताब्यात घेतले. अनिल लक्ष्मण दडस (वय २६,रा दुधेबावी,ता .फलटण), गौरव साहेबराव शेटे (वय २०,रा.वायसेवाडी,खेड,ता.कर्जत,जि अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून इतर तीघेजण फरार आहेत. यासंदर्भात अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

  कृष्णराज धनाजी जाचक व त्याचा मित्र पृथ्वीराज ज्ञानदेव चव्हाण (रा. संभाजीनगर ,सूर्यकिरण, बारामती) हे दोघेजण यामाहा या दुचाकीवरुन येऊन बारामती शहरातील जळोची रोड लगत पानसरे ग्रीन सिटी शेजारी मोकळ्या जागेत रात्री साडेसात ते साडे आठच्या दरम्यान पब्जी गेम खेळत होते.त्यावेळी अंदाजे २५ ते ३० वयोगटातील ४ अज्ञात युवक एका पिवळी नंबर प्लेटअसलेल्या इटियाॅस या कारमधून त्याठिकाणी आले. कृष्णराज यास एकाने पकडून जबरदस्तीने कारमधून नेले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण याचा मोबाईल फोन व सिमकार्ड तसेच दुचाकीची चावी हिसकावून नेला. यानंतर चव्हाण याने कृष्णराजच्या वडिलांना हा प्रकार सांगितला, यानंतर रात्री साडेनऊ च्या सुमारास कृष्णराजचे वडिल धनाजी जाचक यांच्या फोनवर कृष्णराज याचा फोन आला की, काही मुलांनी मला जळोची परीसरातून मारहाण करून चारचाकी गाडीत जबरदस्तीने बसवून माझ्या डोळ्याला पट्टी बांधून माझे अपहरण केले आहे, मला कोठे आणले, ते माहित नाही, परंतु ते पैशांची मागणी करत आहेत असे कृष्णराज सांगत असताना त्याच्या जवळील एका आरोपीने फोन हिसकावून घेऊन कृष्णराज याच्या वडिलांना तो म्हणाला “तुझा मुलगा पाचगणीला शाळेला असताना एका मुलीला त्रास दिल्यामुळे तीने आत्महत्या केली आहे, त्याची सुपारी आम्हाला मिळाली आहे ,जर तू पाच कोटी एक तासात दिले नाहीत, मुलाला मुखशील,” असे म्हणून फोन बंद केला .

  बारामती शहर पोलिसांनी फिर्यादी पृथ्वीराज चव्हाण याच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी सदर माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कळवून त्यांचे मार्गदर्शन घेऊन पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या सह सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दंडिले, पोलिस उपनिरीक्षक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार केली. या पोलिस अधिका-यांनी फिर्यादी व कृष्णराज याच्या वडिलांच्या संपर्कात राहून त्यांना येणा-या मोबाईल क्रमांकावरुन आरोपींच्या ठावठिकाणाबाबत माहिती घेतली. बारामती शहर, फलटण, दहिवडी परीसरात तपास करत माहिती गोळा करत मोगराळे घाटामध्ये डोंगर द-यातून मलवडी (ता. माण) परीसरातसुनिल लक्ष्मण दडस व गौरव साहेबराव शेटे या दोघांसह कारचालक संतोष शरण्णाप्पा कुडवे (रा चंदननगर, सर्वे नं ४९तिघांना ताब्यात घेऊन अपहारीत युवक कृष्णराज याची अलगद सुटका करून घेतली.

  यावेळी अपहरणातील इटाॅस कार (क्र एम. एच १४,एच.जी ७८१८)ही ताब्यात घेतली आहे. सदर कामगिरी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नामदेवराव शिंदे, सपोनि प्रकाश वाघमारे, उमेश दंडिले, पोलिस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर, सहाय्यक फौजदार संजय जगदाळे, पोलिस हवालदार शिवाजी निकम, पोलिस नाईक रुपेश साळुंखे, ओंकार सिताप, दादासाहेब डोईफोडे, पोलिस हवालदार तुषार चव्हाण, दशरथ इंगोले,तसेच सायबर पोलिस ठाणे पुणे ग्रामीणचे पोलिस हवालदार कोळी, चेतन पाटील यांच्यासह ठाणे अंमलदार पोलिस नाईक भगवान थोरवे, रणजित देवकर, गोपाळ ओमासे, अतुल जाधव या टीमने केली.

  आरोपी मलवडी (ता माण) परीसरात अपहारित युवक कृष्णराज ला घेऊन लपले होते. कृष्णराज च्या वडिलांनी अडिच कोटी देण्याची तयारी दर्शविली होती, त्यानुसार पैशाची बॅग घेऊन ते चालकासह त्याठिकाणी गेले, त्यावेळी आरोपी दुर्बिणीतून आजूबाजूला पोलिस आहेत का, याची टेहळणी करत होते.त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. मात्र मलवडी गावातील ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने या परीसरातील सर्व रस्ते पोलिसांनी बंद करून ठेवले. यानंतर साध्या वेशात जाऊन आरोपींना जेरबंद केले. आरोपी पर्यंत गनिमी कावा करून पोलिस पोहचले.दरम्यान अपहरण करण्यापुर्वी आरोपींनी पुण्यातून ओला उबेरची कार भाड्याने घेतली, सोमेश्वरनगर येथे दर्शनासाठी जायचे असल्याचे कारचालकाला सांगितले .यानंतर कारचालक संतोष कुडवे मोगराळे घाटात सोडून त्याचा मोबाईल आरोपींनी तो पळून जाऊ नये, यासाठी त्याच्या वाॅचवर एकजण ठेवून आरोपी बारामतीला येऊन कृष्णराज याचे अपहरण केले.

  झटपट श्रीमंतीसाठी केले अपहरण
  आरोपींमध्ये एकजण डाळींबाचा व्यापारी आहे .व्यवसायात त्याला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्याच्यासह त्याचे इतर साथीदार आर्थिकदृष्ट्या कंगाल झाले आहेत, पैशासाठी त्यांनी मोबाईल ही गहाण ठेवला आहे. झटपट पैसे कमविण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींना अपहारित युवकाची माहिती देणा-या खब-याचे नाव निष्पन्न झाले असून त्याला लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले.