पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या रात्री आयएएस अधिकाऱ्याशी तरूणाचे उद्धट वर्तन

पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या रात्री एका आयएएस अधिकाऱ्याशी तरूणांनी उद्धट वर्तन करत वाद घातला. पुण्यातील नवश्या मारूती मंदिराजवळ हा प्रकार घडला.

    पुणे : पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या रात्री एका आयएएस अधिकाऱ्याशी तरूणांनी उद्धट वर्तन करत वाद घातला. पुण्यातील नवश्या मारूती मंदिराजवळ हा प्रकार घडला. याबाबतची माहिती समजताच शहराबाहेरील अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली होती.

    सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित आयएएस अधिकारी हे दत्तवाडी परिसरात राहण्यास असून, त्यांचा येथे बंगला आहे. दरम्यान, रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ते जात होते. यावेळी नवश्या मारूती मंदिराजवळ टेम्पोत बसलेल्या तरूणामध्ये व त्यांच्यात मास्कवरून शाब्दिक वाद झाला. अधिकाऱ्याने तेथून पुढे जात त्यांच्या नातेवाईक असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या एका पोलीस अधिकाऱ्याला माहिती देऊन तेथे जाण्यास सांगितले.

    त्यानुसार, ते अधिकारी व संबंधित आयएएस अधिकारी तेथे आले. त्याचवेळी दत्तवाडी पोलीस देखील चौकात आले. त्या मुलाचा शोध घेण्यात आला. परंतु, तो तेथे दिसून आला नाही. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तर, अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची अफवा पसरली होती. यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.