स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील जरांगे पाटलांच्या पाठीशी; लोकसभेला देणार पाठिंबा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणामध्ये प्रवेश करावा अशी मागणी अनेक संघटना करत आहे. वंचित बहुजन आघाडीनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील जरांगे पाटील यांना निवडणूकीला उभे राहण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.

    कोल्हापूर – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणामध्ये प्रवेश करावा अशी मागणी अनेक संघटना करत आहे. वंचित बहुजन आघाडीनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील जरांगे पाटील यांना निवडणूकीला उभे राहण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी लातूर लोकसभेची निवडणूक लढवावी. आमचा त्यांना पाठिंबा राहील, असे विधान स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केले. त्याच्या या वक्तव्यामुळे मनोज जरांगे पाटील आता राजकारणामध्ये प्रवेश करणार या चर्चांना उधाण आले आहे.

    स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीने रस्त्यावरती येऊन संघर्ष केला व संसदेत जाऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला सत्ताधाऱ्यांना भाग पाडले. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि बहुजन समाजाच्या हितासाठी रस्त्यावरच्या लढाई बरोबर कायदेमंडळात जाऊन मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडायचे असल्यास त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवायला हवी. जालना मतदारसंघातून ते लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील. असा विश्वास संदीप जगताप यांनी व्यक्त केला.

    त्याचबरोबर “आज मनोज जरांगे पाटील हे मराठा बहुजनांचे नेते म्हणून लोकप्रियतेच्या उंच शिखरावरती आहे. रस्त्यावरती त्यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा हा अलौकिक आहे. परंतु, या लढ्याला आजही पूर्ण यश मिळाले नाही. कायदेमंडळात नवीन कायदा झाल्याशिवाय मराठा समाजाला कायमचे टिकणारे आणि योग्य आरक्षण मिळणे अशक्य आहे. यासाठी कायदेमंडळामध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा प्रतिनिधी असायला हवा. असे आमचे प्रामाणिक मत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही आघाडीत न जाता स्वतंत्रपणे समाजाच्या ताकदीवर लोकसभेची निवडणूक लढवावी,” अशा शब्दांत संदीप जगताप यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.