जिल्ह्यासाठी ३५९ कोटींचा आराखडा : जयंत पाटील

जिल्ह्यातील २०२२-२३ मध्ये विविध कामांसाठी तसेच विकासासाठी ३५९ कोटी २२ लाखांच्या आराखाड्यास शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षीच्या ४०४ कोटी ७९ लाखांच्या निधीतील ६० टक्के रक्कम १२ जानेवारीपर्यंत खर्च झाली आहे. उर्वरित रक्कम खर्च करण्याचे तातडीने योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले.

  सांगली : जिल्ह्यातील २०२२-२३ मध्ये विविध कामांसाठी तसेच विकासासाठी ३५९ कोटी २२ लाखांच्या आराखाड्यास शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षीच्या ४०४ कोटी ७९ लाखांच्या निधीतील ६० टक्के रक्कम १२ जानेवारीपर्यंत खर्च झाली आहे. उर्वरित रक्कम खर्च करण्याचे तातडीने योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले.
  कोरोनाचा पार्श्वभूमीवर ऑनलाईन आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, सन २०२२-२३ च्या वार्षिक योजनेसाठी ३५९ कोटी २२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये २७४ कोटी ४० लाख सर्वसाधारण योजना, ८३ कोटी ८१ लाख अनुसूचित जाती घटकांसाठी, १ कोटी १ लाख रुपये आदिवासी घटकांच्या विकासासाठी देण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या नियोजन आराखड्यातून २४० कोटी ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यापैकी अद्याप १६४ कोटी ४४ लाख शिल्लक आहेत. ते वेळेत खर्च करण्यासाठी नियोजन करावे.
  ते म्हणाले, जिल्ह्यात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा कार्यक्रम हाती घ्यावा. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रस्ते, पाणंद रस्ते करावेत. बिलो टेंडरने झालेल्या कामाची माहिती सादर करावी. पर्यटनाला चालना देण्यासाठी चांदोलीमध्ये प्राण्यांच्या ब्रिडींगसाठी निधीची आवश्यकता असल्यास प्रस्ताव सादर करावेत. नदी पात्रातून बाहेर पडणाऱ्या मगरींसाठी तळ्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी. बैठकीत ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ७५ उपकेंद्रांना मंजुरी दिली. काही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्थलांतर, उपजिल्हा रुग्णांमध्ये श्रेणीवर्धन आणि देवस्थानास दर्जा मिळवून देणे इत्यादी विषयांना मंजुरी देण्यात आली.
  बैठकीस महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, समिती सदस्य संजय बजाज, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव प्रत्यक्ष उपस्थित होते.
  तर जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, खासदार संजय पाटील, आमदार सदाभाऊ खोत, अरूण लाड, गोपीचंद पडळकर, डॉ. सुरेश खाडे, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, विक्रम सावंत तसेच समिती सदस्य अजितराव घोरपडे, पृथ्वीराज पाटील, देवराज पाटील, दिगंबर जाधव, रमेश पाटील, अरूण बालटे, रवी तमणगौडा पाटील, जयश्री पाटील, अभिजीत पाटील, अनिल डुबल ऑनलाईन उपस्थित होते.
  सुखवाडी-तुंग पुलासाठी अधिकारी धारेवर 
  डॉ. विश्वजीत कदम यांनी सुखवाडी-तुंग पुलाच्या दिरंगाईबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. भूसंपादनाचे काम सुरू आहे. लवकर काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कुंडल ते ताकारी रस्त्याचे काम देखील तातडीने पूर्ण करावे असे आदेश डॉ. कदम यांनी दिले.
  जिल्ह्याला आता सीसीटीव्हीची सुरक्षा 
  गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर आता करडी नजर ठेवण्यात येणार आहे. या सर्व रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलिस विभागाने आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत, असेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.