सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक तात्काळ घोषित करा ; शिक्षक संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

मुदतवाढ दिलेली तारीख संपल्यानंतर पुढील कालावधीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार सत्ताधारी संचालक मंडळाला नसताना बँकेत मनमानी कारभार सुरू आहे.बँकेत संगणक दुरुस्ती, फर्निचर, रंगरंगोटी, संचालक मंडळ दौरे,स्टेशनरी खरेदी या नावाखाली उधळपट्टी चालू असल्याचा आरोपही शिक्षक संघाने केला आहे.

    सांगली :  सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची पंचवार्षिक मुदत २५ एप्रिल २०२२० रोजी संपली आहे.कोरोना आपत्ती मुळे सत्ताधारी संचालक मंडळाला दोन वर्षांचा वाढीव कालावधी मिळाला आहे. शासनाच्या आदेशानुसार ३१ऑगस्ट २०२१ पर्यंत सर्व सहकारी संस्थांना मुदतवाढ दिली होती, त्यानंतर सर्व संस्थांच्या मुदत संपलेल्या तारखेनुसार टप्पे पाडून निवडणूका घोषित केल्या. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक अजून घोषित झाली नाही, ती तात्काळ घोषित करावी, यासाठी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

    सत्ताधारी संचालक मंडळाच्या चुकीच्या धोरणामुळे बँकेत कोट्यवधी रुपयांची थकबाकी वाढली आहे. याच थकबाकी वसुलीच्या निमित्ताने बँकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन संचालक प्रचारासाठी फिरत असल्याचा आरोप पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी यांनी केला आहे.
    सभासदांचा विश्वास गमावलेल्या व दोन वर्षे झाले मुदत संपलेल्या सत्ताधारी संचालक मंडळाला बँकेत कारभार करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, त्यामुळे तात्काळ निवडणूक घोषित करण्यात यावी, अशी मागणी सहकार मंत्री यांचेकडे राज्य संघाचे कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी,राज्य उपाध्यक्ष हंबीरराव पवार,पार्लमेंटरी बोर्डाचे नेते अरुण पाटील,जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे,सरचिटणीस अविनाश गुरव,संचालक सुधाकर पाटील,सुरेश खारकांडे,खानापूर तालुकाध्यक्ष संतोष जगताप,संजय काटे यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

    अधिकार नसताना निर्णय घेतले
    मुदतवाढ दिलेली तारीख संपल्यानंतर पुढील कालावधीत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार सत्ताधारी संचालक मंडळाला नसताना बँकेत मनमानी कारभार सुरू आहे.बँकेत संगणक दुरुस्ती, फर्निचर, रंगरंगोटी, संचालक मंडळ दौरे,स्टेशनरी खरेदी या नावाखाली उधळपट्टी चालू असल्याचा आरोपही शिक्षक संघाने केला आहे.