शिवसेना एका गुबगुबीत खुर्ची पुरती मर्यादित, ती संपत चाललीये; चंद्रकांत पाटलांची टीका

शिवसेना ही मुख्यमंत्रिपदाच्या एका गुबगुबीत खुर्ची पुरती मर्यादित झाली असून, शिवसेना संपत चालली आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. तसेच मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना घेरावा घातला ही सांगलीतील स्थानिक शिवसैनिकांची भूमिका योग्यच असून, जनता आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादीला वैतागले आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

    सांगली : शिवसेना ही मुख्यमंत्रिपदाच्या एका गुबगुबीत खुर्ची पुरती मर्यादित झाली असून, शिवसेना संपत चालली आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. सांगलीमध्ये पाटील हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते. तसेच मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना घेरावा घातला ही सांगलीतील स्थानिक शिवसैनिकांची भूमिका योग्यच असून, जनता आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादीला वैतागले आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

    मुंबई बँकेत चेअरमन राष्ट्रवादी आणि व्हाईस चेअरमन भाजपचा निवडून आला आहे. त्यामुळे आता तर शिवसेनेला कळायला हवं की, शिवसेनेला फक्त एक मुख्यमंत्रिपदाची गुबगुबीत खुर्ची मिळाली आहे, बाकी काही मिळालं नाही. शिवसेनेला सहकार, विद्यापीठ, कायदा अशा अनेक गोष्टींची माहिती नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

    …तरी सांगलीत भाजपचा उमेदवार निवडून येणार

    जयंत पाटील यांनी काँग्रेसचा प्रचार केला काय किंवा शिवसेनेचा तरी सांगलीत भाजपचा उमेदवार निवडून येणार आहे. मात्र, सांगलीतील शिवसैनिकांनी मांडलेली भूमिका योग्य असून, सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हा वैतागलेला आहे. त्याचे चित्र म्हणजे जयंत पाटील यांना शिवसैनिकांनी सांगलीत घातलेला घेराव आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.