मराठा आरक्षण रद्द होण्यास भाजपच जबाबदार; महादेव साळुंखे यांचा आरोप

    सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी न्यायालयात दावे करण्यास भाजपचे नेतेच जबाबदार आहेत. हे मराठ्यांनी जाणून त्यांच्यापासून चार हात दूरच राहावे. आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठा समाज फिरू देणार नाही. त्यांच्या गाड्या अडवू, असा इशारा मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.

    साळुंखे पुढे म्हणाले, २०१८ मध्ये १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांचा आरक्षणाचा अधिकारच घेतला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांनी आरक्षणाचा निर्णय घेतला. ते उच्च न्यायालयात टिकले. मात्र, सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. न्यायालयात जाणारे भाजप समर्थकच आहेत. समाजाच्या हिताविरोधात काम करणाऱ्या भाजपच्या डावाला यापुढे तरी फसू नये.

    कोरोनाची साथ कमी झाल्यामुळे आम्ही पुन्हा आंदोलन, मोर्चे याकडे वळणार आहे. सर्व संघटनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लढा सुरू राहील. आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यासाठी लोकसभा, राज्यसभेत मंजुरीने राष्ट्रपतींच्या सहीने परिशिष्ट ९ मध्ये समाविष्ट करून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची मान्यता देऊनच समाजाला आरक्षण मिळेल. मराठा मागास आहे, त्यासाठी राज्य सरकारही पिटीशन दाखल करणार आहे, असे ते म्हणाले.