केंद्र सरकारने तातडीने लस उपलब्ध करावी : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

    सांगली : कोरोनो महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसला. मात्र, अनेक देशांनी तातडीने लसीकरण केल्यामुळे त्यांचा धोका टळला आहे. युरोप, अमेरिकेसारख्या देशांचे जनजवीन पूर्वपदावर आले आहे. आतातरी केंद्र सरकारने राज्य सरकारला लसीचा तातडीने पुरवठा करावा, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

    चौदाव्या वित्त आयोगाच्या रक्कमेतील व्याजातून प्राथमिक आरोग्य केंद्रांना ३५ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज मुश्रीफ, पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, विक्रम सावंत जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, आरोग्य सभापती आशा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी उपस्थित होते.

    ते म्हणाले, कोरोनामुळे राज्यात लाखांवर जणांचे मृत्यू झाले आहेत. कोरोना संकटाला प्रशासन सामोरे गेले. या काळात आरोग्य यंत्रणा बळकट झाली आहे. लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारने निविदा काढल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने लस कंपन्यांना राज्य सरकारबरोबर चर्चा करू नका, आम्हाला ७५ टक्के लसी द्यावी, अशी मागणी केली. उशिरा का होईना सर्वांना मोफत लस देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. हे अगोदरच करायला हवे होते. लसीचे दोन्ही डोस घेतलेले देश आता पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे केंद्राने आता तरी तातडीने लस उपलब्ध करून द्यावी.

    पाटील म्हणाले, मुश्रीफ यांच्यामुळे रुग्णवाहिकांसाठी तातडीने निधी मिळाला. या रुग्णवाहिकांचा आता चांगला उपयोग होणार आहे. आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी ९ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. केजरीवाल सरकारप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळा आधुनिक करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा कोरे यांचे भाषण झाले. सभापती आशा पाटील यांनी प्रास्ताविक केले.