कर्नाटकातील चेन स्नॅचिंग करणारे सराईत चोरटे तासगाव पोलिसांकडून जेरबंद ; आरोपींमध्ये मंगसुळीचे दोन तर मळणगावच्या एकाचा समावेश

२ फेब्रुवारी २०१९ रोजी चिंचणी हद्दीत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शालन दत्तात्रय माळी (वय ५५) रा. माळीनगर ,भैरववाडी या शेतात काम करत होत्या. यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी माळी यांच्या गळ्यातील बोरमाळ हिसडा मारून लंपास केली होती.याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    तासगाव : गेल्या आठ महिन्यापूर्वी चिंचणी ( ता. तासगाव ) येथील एका वृद्धेच्या गळ्यातील बोरमाळ हिसडा मारून लंपास केलेल्या मंगसुळी (तालुका अथणी जिल्हा बेळगाव) येथील दोन सराईत चोरट्यांना तसेच चोरीचा मुद्देमाल खरेदी करणाऱ्या मळणगाव (ता. कवठेमंकाळ ) येथील एकास तासगाव पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून इतरही गुन्ह्यांचा उलगडा झाला असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे आणि पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

     

    अमित अशोक नाईक (वय ३०) रा. मंगसुळी आणि मारुती उर्फ आकाश धर्माजी हारळे (वय २०) रा. मोळे, दोघेही तालुका अथणी ,जिल्हा बेळगाव आणि सोने खरेदी करणारा रमेश पांडुरंग शिंदे (वय ४५) रा. मळणगाव , तालुका कवठेमंकाळ या तिघांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे.

    २ फेब्रुवारी २०१९ रोजी चिंचणी हद्दीत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शालन दत्तात्रय माळी (वय ५५) रा. माळीनगर ,भैरववाडी या शेतात काम करत होत्या. यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी माळी यांच्या गळ्यातील बोरमाळ हिसडा मारून लंपास केली होती.याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे आणि पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनानुसार तासगाव गुन्हा शाखेतील पोलीस नाईक सागर लवटे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कसून तपास करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले.संबंधितांनी चोरीची कबुली दिल्यानंतर लंपास केलेले सोने खरेदी करणाऱ्या आरोपीला मळणगाव येथून ताब्यात घेतले. संबंधित आरोपीकडून ३८ ग्रॅम वजनाचे एक लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेला दोन मोटारसायकली असा एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    जेरबंद चोरटे अट्टल गुन्हेगार

    चेन स्नॅचिंग प्रकरणी अटक केलेले कर्नाटकातील दोन्ही संशयित गुन्हेगार हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीदेखील चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर यापूर्वी चिंचणी, गोटेवाडी,कौलगे तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एरंडोली या गावात जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे आणि पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी यावेळी दिली.