हाती आले टॅब अन् शिकणं झालं सोपं; जयंत पाटील यांच्या हस्ते टॅबचे वाटप

घरच्या परिस्थितीमुळे त्याना या कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. शिक्षणाच्या प्रवाहातून ही मुले बाहेर पडू नयेत म्हणून प्रतिक जयंत पाटील यानी पुढाकार घेत जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टॅब दिले.

    इस्लामपूर : इस्लामपुरातील जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानांतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. टॅब हाती आल्याने शिकणं सोपे होणार असल्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.

    जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील जयंत दारिद्रय निर्मुलन अभियान  राबविले जाते. दारिद्रय रेषेखालील मुलांचे शिक्षण अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी एक विशेष अभियान राबविण्यात येत आहे. अमेझॉन इंडियाच्या सहकार्याने २५० विद्यार्थ्यांना या अभियानाच्या माध्यमातून टॅब वाटप करण्यात आले.

    ऑनलाईन शिक्षणाची सुविधा

    कोरोना-१९ या जागतिक महामारीच्या काळामध्ये असामान्य अशी परिस्थिती निर्माण झाली. मानवी जीवनाच्या सर्वच बाजूवर या संकटाने प्रभाव टाकला. याचा शैक्षणिक प्रक्रियेवरही परिणाम झाला. कोरोना विषाणूच्या भीतीने सध्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. आतां विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात झाली.

    यामध्ये गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना  केवळ ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल, टॅब, संगणक आणि इंटरनेट सुविधा या मुलभूत गोष्टीं नसल्यानें ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ लागली.  या मुलांची नेमकी हीच अडचण ओळखून प्रतीक जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना  ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल, टॅब, संगणक आणि इंटरनेट सुविधा या मुलभूत गोष्टी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

    प्रतिक पाटील यांचा पुढाकार

    घरच्या परिस्थितीमुळे त्याना या कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. शिक्षणाच्या प्रवाहातून ही मुले बाहेर पडू नयेत म्हणून प्रतिक जयंत पाटील यानी पुढाकार घेत जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टॅब दिले. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना मोबाईल, टॅब, संगणक घेणे आणि इंटरनेट सुविधा घेणे परवडत नाही. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी ते अभ्यासात मागे पडून त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. टॅब उपलब्ध झाल्याने मुले शिक्षणाच्या प्रवाहात राहणार आहेत.