जागतिक ह्रदयदिनीच डॉक्टरचा व्यायाम करताना मृत्यू

    सांगली : जागतिक ह्रदयदिनीच जीममध्ये व्यायाम करताना एका डॉक्टरचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सांगली-मिरज रस्त्यावरील एका जीममध्ये व्यायाम करत असताना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने डॉ. अशोक महावीर धोंडे (वय ४७, रा. धामणी रोड, विश्रामबाग) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, जागतीक ह्रदयदिनी डॉक्टरचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

    डॉ. धोंडे यांचा सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर दवाखाना आहे. ते एमडी सर्जन होते. गेल्या काही दिवसापासून सांगली-मिरज रस्त्यावरील एका जीममध्ये व्यायाम करण्यासाठी नित्याने येत होते. आज सायंकाळी सहाच्या दरम्यान ते जीममध्ये आले. थोडावेळ व्यायाम केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर चक्कर येऊन उलटी झाली. बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

    उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. डॉ. धोंडे यांच्या संपर्कातील अनेक डॉक्टर रुग्णालय परिसरात जमले होते. ह्रदयदिनी मृत्यू झाल्‍याने हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. पोलिस अतुल माने, तावरे यांनी प्राथमिक तपास केला.