पालिकेच्या सभागृहात ३६ वर्षांनी झळकल्या प्रतिमा; वसंतदादा व बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र

नगरपालिकेच्या अण्णासाहेब डांगे सभागृहात सत्ताधारी विकास आघाडी आणि शिवसेनेने राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले पद्मविभूषण वसंतदादा पाटील व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावत राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली.

  इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : येथील नगरपालिकेच्या अण्णासाहेब डांगे सभागृहात सत्ताधारी विकास आघाडी आणि शिवसेनेने राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले पद्मविभूषण वसंतदादा पाटील व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावत राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली.

  १९८५ पूर्वी जवळपास ३० वर्षे पवार पार्टीची एकहाती सत्ता होती. माजी नगराध्यक्ष स्व. एम. डी. पवार उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे मानस पुत्र म्हणून राजकीय क्षेत्रात ओळखले जात होते. त्यांचे वसंतदादा पाटील यांच्याशीही जवळकीचे नाते होते. त्यामुळे त्यांना शहर आणि तालुक्याच्या राजकारणात मोठा मान होता. तोपर्यंत वसंतदादांचे छायाचित्र सभागृहात होते. १९८५ साली पवार पार्टीची मोठी वाताहत झाली. या निवडणुकीत अत्यंत एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. तत्कालीन नागरिक संघटनेने सत्ता मिळवली . त्यानंतर दादांची प्रतिमा गायब झाली . आज तब्बल ३६ वर्षांनंतर विकास आघाडी-शिवसेनेने वसंतदादांची प्रतिमा कायमस्वरूपी राहील अशी व्यवस्था करत तिचे अनावरण केले.

  शेवटच्या दिवशी अंमलबजावणी

  शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार यांनी हा ठराव मांडला होता. या ठरावांची सोमवारी (दि. ३) अंमलबजावणी करत सत्ताकाळाच्या शेवटच्या दिवशी विकास आघाडी-शिवसेनेने या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा सभागृहात लावल्या. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार, आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार, नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार, मंगल शिंगण, सीमा पवार, अन्नपुर्णा फल्ले यांच्याहस्ते या प्रतिमांचे अनावरण झाले. मुख्याधिकारी वैभव साबळे व सर्व प्रशासन प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे सर्व व विकास आघाडीचे काही नगरसेवक यावेळी उपस्थित नव्हते.

  सन १९८५ साली झाला ठराव

  या सभागृहात यापूर्वी स्व. लोकनेते राजारामबापू पाटील व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या दोन मोठ्या प्रतिमा पिठासीन अधिकाऱ्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आल्या होत्या. दिवंगत नगराध्यक्षांची तैल चित्रेही सभागृहात लावण्यात आली आहेत. य‍ाच सभागृहात स्व. वसंदादांची प्रतिमा लावण्याचा ठराव यापूर्वी सन १९८५ साली करण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नव्हती. तर विकास आघाडी व शिवसेनेची सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्याचा ठराव करण्यात आला होता.