हरिपुरात सापडला हेलिकॉप्टर मासा; अन्य जलचरांची अंडी खाण्यातही आहे तरबेज

प्राणिमित्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार या माशाचे मूळ उगमस्थान अमेरिकेतले आहे. भारतामध्ये मुंबईतील खाडीत आणि वाराणसीच्या गंगा नदीत हा मासा आढळल्याची अलीकडील उदाहरणे आहेत. या माशाची वाढ जलदगीने होते.

    सांगली : मिरज तालुक्यातील हरिपूर येथे कृष्णा नदीपात्रात रविवारी मच्छीमार विकास नलवडे यांना दुर्मिळ हेलिकॉप्टर (सकर) मासा सापडला. मासा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नेहमीप्रमाणे नलवडे मासेमारी करण्यासाठी नदीपात्रात गेले होते. त्यावेळी त्यांच्या जाळ्यात हेलिकॉप्टर मासा सापडला.

    प्राणिमित्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार या माशाचे मूळ उगमस्थान अमेरिकेतले आहे. भारतामध्ये मुंबईतील खाडीत आणि वाराणसीच्या गंगा नदीत हा मासा आढळल्याची अलीकडील उदाहरणे आहेत. या माशाची वाढ जलदगीने होते. तसेच मासा मिश्राहारी असल्याने तो शेवाळ्यांबरोबर इतर माशांना सहज खातो. याशिवाय माशांसह नदीतील अन्य जलचरांची अंडी खाण्यातही तो तरबेज असतो.

    हा मासा टणक असल्याने इतर माशांपासून तो सुरक्षित असतो. शिवाय पाण्याच्या बाहेर आला की तो जमिनीवर सापाप्रमाणे नागमोडी वळणे घेत चालतो. तसेच पाण्याच्या बाहेर चार ते पाच तास जिवंतही राहू शकतो. याच्या संपूर्ण अंगाला काटे असल्याने बाजारात या माशाला मागणी नसते.

    कधी कधी हे मासे पाण्यातून बाहेर येऊन सुमारे फूट ते दीड फूट हवेत उडून हवेतील हवा फुफ्फुसामध्ये भरुन घेतात. पाण्यातून बाहेर येत असल्यामुळे यांना फ्लाईंग फिश तर कधी हेलिकॉप्टर मासा म्हणून ओळखतात. श्वसनासाठी कल्लेपण असतात. हा मासा कॅट फिश या प्रकारामध्ये मोडतो. संपूर्ण अंगावर काटेरी खवले असतात व परांना लांब काटे असतात. पाण्यातील शेवाळ हे या माशाचे प्रमुख खाद्य आहे. शेवाळ्यांना चिकट द्रवाच्या मदतीने चिकटून राहतात. सांगली आणि कृष्णा नदीत मात्र हा मासा आज पहिल्यांदाच मिळालेला आहे.

    in Haripur Helicopter fish found by fisherman vikas nalawade