Jayant Patil on Agriculture Act Devendra Fadnavis was hit hard

शरद पवार जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना एवढा मोठा हमीभाव दिला की दिल्लीतले शेतकरी आजही म्हणतात पवार साहब ने जो किया, वो आजतक किसीने नहीं किया असे म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

सांगली : किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने रविवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील सभेत राज्य सरकारवर टीका करत कायदा कसा चांगला आहे हे सांगितले. त्यांच्या या टीकेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना एवढा मोठा हमीभाव दिला की दिल्लीतले शेतकरी आजही म्हणतात पवार साहब ने जो किया, वो आजतक किसीने नहीं किया असे म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

भाजप सरकारने आणलेला कायदा कसा बरोबर आहे हे सांगण्यासाठी आज महाराष्ट्रात आणि उर्वरित देशात भाजपचे लोकं मोर्चा काढत आहे. माझे त्यांना आवाहन आहे की इथे गल्लीत मोर्चा काढण्यापेक्षा दिल्लीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद साधा असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपचे लोक आज म्हणतायेत की राष्ट्रवादी काँग्रेसला मार्केट कमिट्या वाचवायच्या आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो आम्हाला मार्केट कमिट्या नाही तर आमच्या शेतकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवायचे आहेत. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी हा लढा असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

आजही एफआरपीचा कायदा अस्तित्वात आहे. कारण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. नवी व्यवस्था तयार होत नाहीत तोपर्यंत जुनी व्यवस्था मोडून काढू नये या मताचे आम्ही आहोत. आज देशातील सर्व गोष्टींचे खाजगीकरण केले जात आहेत. ते धनवानांच्या हाती जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.