
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या अजेंड्यावर असणार्या तज्ञ संचालक निवडीबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पॅनेलप्रमुख दिलीपतात्या पाटील यांनी मनोज शिंदे यांचे नाव जाहीर केले. काँग्रेसकडून मात्र नाव निश्चित झाले नव्हते.
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये दोन स्वीकृत संचालकांची निवड बुधवारी पहिल्याच बैठकीत करण्यात आली. राष्ट्रवादीकडून मनोज शिंदे-म्हैसाळकर यांची तर काँग्रेसने जतचे जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांची निवड झाली. निवडीवेळी काँग्रेसमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून आले. संचालक मंडळाची बैठक संपल्यानंतर अध्यक्ष तथा आ. मानसिंगराव नाईक यांनी काँग्रेसचे स्वीकृत संचालक म्हणून पाटील यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसची अवस्था वरातीमागून घोडे अशी झाली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या अजेंड्यावर असणार्या तज्ञ संचालक निवडीबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पॅनेलप्रमुख दिलीपतात्या पाटील यांनी मनोज शिंदे यांचे नाव जाहीर केले. काँग्रेसकडून मात्र नाव निश्चित झाले नव्हते. बराच वेळ प्रतिक्षा केल्यानंतर काँग्रेसचे नाव येत नसेल तर त्यांचे तज्ञ संचालक पदाचे नाव पुढील बैठकीत घ्या. मात्र आता राष्ट्रवादीचे नाव जाहीर करा, अशी मागणी दिलीपतात्या पाटील यांनी केली. त्यामुळे राष्ट्रवादीकडून शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले.
काँग्रेसमध्ये आ. विक्रम सावंत, विट्याचे अजय गायकवाड, इस्लामपूरचे वैभव पवार यांची नावे चर्चेत होती. मात्र एकमत होत नव्हते. आमदार सावंत यांच्या नावाला काहींचा विरोध होता, त्यामुळे सावंत यांनीही आपल्या ऐवजी जतमधील कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी विनंती केली. त्यांनी सरदार पाटील यांच्या नावाची शिफारस काँग्रेस नेते व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे केली. मात्र एकमत होऊन हे नाव अध्यक्ष नाईक यांच्याकडे पोहोचेपर्यंत बैठक संपली होती.
बैठकीत राष्ट्रवादीचे एकच नाव जाहीर झाल्याने वेगळा संदेश जाईल. या विचाराने काँग्रेसचे संचालक महेंद्र लाड यांनी काँग्रेसकडून सरदार पाटील यांचे नाव जाहीर करण्याची विनंती केली. त्यानुसार नाईक यांनी उपाध्यक्ष जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत पाटील यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान निवड जाहीर होण्यापूर्वीच सरदार पाटील यांच्या समर्थकांनी जतमध्ये व सोशल मिडीयावर जल्लोष सुरू केला होता. मनोज शिंदे यांचे समर्थक निवड होणार हे नक्की असल्याने दुपारपासून बँकेच्या आवारात उपस्थित होते. त्यांनीही फटाके व गुलाल उधळत जल्लोष केला.