
हौसाबाई पाटील यांनी क्रांतिसिंहाच्या सोबत काही काळ स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. सांगली जिल्ह्यातल्या हणमंतवडिये या गावी राहत होत्या.
सांगली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणी, प्रतिसरकारची स्थापना करणारे स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतीविरांगणा हौसाबाई पाटील यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. याबाबतची माहिती त्यांचा मुलगा ॲड. सुभाष पाटील यांनी दिली.
हौसाबाई पाटील यांच्यावर कराड येथील कृष्णा चॅरिटेबल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या हणमंतवडिये या गावात शासकीय नियमात पार्थिवावर अंत्यविधी होणार आहेत.
हौसाबाई पाटील यांनी क्रांतिसिंहाच्या सोबत काही काळ स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. सांगली जिल्ह्यातल्या हणमंतवडिये या गावी राहत होत्या. पत्री सरकारला स्वातंत्र्यसेनानी जी. डी. बापू लाड, स्वातंत्र्यसेनानी शाहीर शंकरराव निकम आणि क्रांतीविरांगना हौसाबाई पाटील यांचं भक्कम पाठबळ लाभलं होतं. पत्री सरकारला आवश्यक असणारा शस्त्रपुरवठा करण्याचं काम त्या काळात हौसाबाईंनी केलं होतं.
इंग्रजांविरोधातल्या लढ्यात पत्री सरकारमधील कार्यकर्त्यांनी विविध प्रकारची सोंगं, भन्नाट कल्पना लढवून इंग्रजांना जेरीस आणलं होतं. इंग्रजांनी ठिकठिकाणी उभारलेले डाक बंगले जाळणं असो, रेल्वेचे रूळ उखाड्णं असो, फोनच्या तारा तोडणं असो वा इंग्रजांचा खजिना लुटणं असो, या सर्वच गोष्टीमध्ये हौसाताई आघाडीवर असायच्या.
क्रांतीसिंह नाना पाटलांची एकुलती एका मुलगी असलेल्या हौसाबाई 3 वर्षांच्या असतानाच त्यांच्यावरील आईचं छत्र हरवलं. देशवसेवेचा वसा घेतलेल्या वडिलांचा सहवासही त्यांना पुरेशा प्रमाणात मिळाला नाही. स्वातंत्र्य लढ्यासाठी वडील भूमिगत राहत असल्यामुळे हौसाबाई अत्यंत खडतर परिस्थितीत जीवन जगावं लागलं. मात्र, देशभक्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं.
पुढे प्रतिसरकारच्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. इंग्रजांच्या नजरा चुकवून भूमिगत असलेल्या कार्यकर्त्यांना निरोप पोहोचवणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, पत्रीसरकारला लागणाऱ्या हत्यारांची ने-आण करणे, अशी कामं त्यांनी केली.
स्वत: क्रांतीसिंह नाना पाटलांनी हुंडा, मानपान, मंडप, वाजंत्री, जेवण, कोणताही धार्मिक विधी न करता हौसाबाईंचे लग्न स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते भगवानराव मोरे पाटील यांच्याशी लावून दिलं. एकमेकांना हार घालून गांधी पद्धतीनं त्यांनी हे लग्न लावून दिलं. ही प्रथा पुढे अनेक कार्यकर्त्यांनीही सुरू ठेवली.