
जंगलात व चित्रांत दिसणारे गवे, बिबटे आणि बछडे आता वाळवा तालुक्यात मुक्त संचार करू लागले आहेत. सलग दोन दिवसांत गव्याने केलेले हल्ले, बिबट्याचे हल्ले आणि मृत बिबट्या मिळाल्याने धास्ती वाटू लागली आहे.
इस्लामपूर / विनोद मोहिते : जंगलात व चित्रांत दिसणारे गवे, बिबटे आणि बछडे आता वाळवा तालुक्यात मुक्त संचार करू लागले आहेत. सलग दोन दिवसांत गव्याने केलेले हल्ले, बिबट्याचे हल्ले आणि मृत बिबट्या मिळाल्याने धास्ती वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर वनविभाग सुसज्ज होण्याची आणि या विभागाने दक्ष राहण्याची गरज आहे.
चांदोलीच्या जंगलात असणारे बिबटे व गवे आता शिराळा तालुका ओलांडून वाळवा तालुक्यात आले आहेत. पूर्वी जंगल परिसरात त्यांचा मर्यादित वावर असायचा. बिबट्यासारखा घातक वन्यप्राणी वाळवा तालुक्यात येऊ शकतो का ? अशी स्वप्नवत वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात येताना दिसतेय.
गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा बागायती टापूतील वावर अधिकच अधोरेखीत झाला आहे. तालुक्यातील कृष्णा-वारणा नदीकाठ मगरींच्या धास्तीखाली आहे. वाळवा तसेच शिराळा तालुक्यात बिबट्याने अनेक ठिकाणी पाळीव जनावरे व कुत्र्यांचा फडशा पाडत आहेत. मात्र, वनविभाग केवळ घटनास्थळी दाखल होणे, पंचनामे करणे आदी कामात दंग दिसतो.
सुदैवाने बिबट्याच्या हल्ल्यात कोणी जीव गमावलेला नाही. मात्र, बिबट्यांचा सर्वत्र सुरू असलेला संचार पाहता बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्याची टांगती तलवार शेतकऱ्यांवर कायमचीच राहिली आहे. यात आता गव्याची भर पडली आहे.