सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षपदी जयश्री पाटील

बँकेची निवडणूक गेल्या आठवड्यात पार पडली. महाआघाडीचे १७ तर भाजपचे ४ उमेदवार निवडून आले आहेत. जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी निवडणुकीचा अहवाल सहकार निवडणूक प्राधिकरण व विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून पदाधिकारी निवडीची अधिसूचना जारी झाली आहे.

    सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी बिनविरोध पार पडली,
    संचालक मंडळाची सर्वसाधारण सभेत अध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक तर उपाध्यक्ष पदी दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची निवड करण्यात आली.

    बँकेची निवडणूक गेल्या आठवड्यात पार पडली. महाआघाडीचे १७ तर भाजपचे ४ उमेदवार निवडून आले आहेत. जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी निवडणुकीचा अहवाल सहकार निवडणूक प्राधिकरण व विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून पदाधिकारी निवडीची अधिसूचना जारी झाली आहे. जिल्हा बँक संचालक मंडळाची बैठक घेऊन पदाधिकारी निवड केली. सर्वसाधारण सभेत अध्यक्ष पदासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांचे नाव माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सुचवले तर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी अनुमोदन दिले, उपाध्यक्ष पदासाठी जयश्रीताई पाटील यांचे नाव पृथ्वीराज पाटील यांनी सुचवले तर माजी उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी अनुमोदन दिले.

    निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करताना काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा सांगितला होता. मात्र सर्वाधिक संचालक राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहिले. काँग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी जयश्री पाटील यांची वर्णी लागली, निवडीनंतर जिल्हा बँक परिसरात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

    जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यामुळे मला अध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे, सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन शेतकऱ्यांची बँक प्रगतीपथावर नेणार, शेकऱ्यांच्या बरोबर युवकांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी बँकेची भूमिका सकारात्मक असेल.

    आमदार मानसिंगराव नाईक , अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक

    “स्व वसंतदादा पाटील, विष्णूअण्णा पाटील, मदनभाऊ पाटील यांनी या बँकेत सहकार वाढवण्यासाठी काम केलं, मला आज सर्वांच्या पाठींब्याने उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे, मी शेतकरी, युवक आणि महिला बचत गटांसाठी काम करून सहकाराचा वारसा नेटाने चालवणार आहे.”
    -जयश्री पाटील , उपाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक