मिरज बीडीओ चौकशीच्या फेऱ्यात ; जि.प. अध्यक्षांचे आदेश

- मनमानी कारभार, सदोष अहवालांचा आरो

  सांगली : मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. प्रमुख तीन मुद्यांसह त्यांची खातेनिहाय चौकशी करावी आणि मिरज तालुक्यातून त्यांच्या कारभाराने पिचलेल्या लोकांकडून माहिती मागवून त्याचीही चौकशी करण्यात यावी, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्वतंत्र चौकशी समिती नेमून ही प्रक्रिया पार पाडावी, असे आदेशात म्हटले आहे.

  मिरज पंचायत समितीच्या कारभाराविषयी गेल्या काही काळात सातत्याने तक्रारी येत आहेत. मनमानी कारभार, राजकीय दबावाखाली कायदा वाकवणे, चौकशी अहवालांत मनमानी पद्धतीने बदल करणे, कायद्यात नसलेले आदेश देणे, अशा स्वरुपाच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या, असे अध्यक्षा सौ. कोरे यांनी सांगितले.

  मिरज तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीपैकी ३० ग्रामसेवक हे प्रतिनियुक्तीवर आहेत. तीन ग्रामसेवकांना कोणतीही जबाबदारी न देता त्यांना पंचायत समितीत थांबवून घेण्यात आले आहे. हे खूप गंभीर आणि दुर्दैवी असून ग्रामसेवकांच्या प्रतिनियुक्तांमागचे इंगित काय, याची चौकशी करावी, असे आदेशात म्हटले आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत आरग येथील तीन विहिरींना २०१५-१६ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यावर कोणतीही कार्यवाही न करता २०१९ मध्ये सदर विहिरी रद्द कऱण्यात आल्या. यासंबंधी कारवाईचे आदेश दिले होते. परंतू, या कामात तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांपासून जबाबदार शासकीय कर्मचारी दोषी असताना केवळ एका रोजगार सेवकाला त्यात दोषी ठरवून इतरांना वाचवण्याचा उद्योग गटविकास अधिकारी सरगर यांनी केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. त्याची सखोल चौकशी व्हावी, असेही आदेशात म्हटले आहे.

  स्वच्छ भारत अभियानात अनुसुचित जाती घटकातील शौचालय सुशोभीकरणच्या कामासाठी जिल्हा परिषदेतर्फे ७ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मिरज पंचायत समितीला देण्यात आले होते. सदर रक्कम ग्रामपंचायतीला देणे आवश्‍यक असताना तत्कालीन गटविकास अधिकाऱयांनी ती रक्कम तीन संस्थांना ऑर्डर काढून दिली. हे पूर्णपणे चुकीचे होते. काम न करताही सदर संस्थांना निधी वितरीत करण्यात आला. यात अनेकांची चौकशी झाली, मात्र फक्त श्रीमती कांबळे यांनाच दोषी धरून कारवाई करताना इतरांना वाचवण्याचा उद्योग विद्यमान गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणांची सखोल चौकशी करावी, गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशांमागचा हेतू तपासावा, असे आदेश मी दिले आहेत, असे अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे यांनी सांगितले.

  खातेनिहाय चौकशी होईल

  अध्यक्षा प्राजक्ता कोरे म्हणाल्या, ‘‘मिरज पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या कारभाराविषयी एवढ्या तक्रारी आहेत की त्यांची संपूर्ण खातेनिहाय चौकशी करण्याची गरज आहे. या तीन प्रमुख मुद्यांसह एकूणच पंचायत समितीतील प्रशासकीय कारभाराची चौकशीदेखील केली जाईल.’’