शिक्षक बँकेविरुद्ध आजपासून आंदोलन

    सांगली : शिक्षक बँकेतील सत्ताधारी गटाविरुद्ध सांगली जिल्हा शिक्षक संघाच्या वतीने ‘साष्टांग नमस्कार, विनंती विशेष’ हे आंदोलन आज (शनिवार) पासून दहा दिवस करण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली.

    शिंदे म्हणाले, बँकेतील सत्ताधाऱ्यांनी जाहीरनाम्यात ‘एक अंकी व्याजदर आणि दोन अंकी लाभांश ‘ अशी घोषणा केली होती. सत्ताधाऱ्यांचा कार्यकाल पूर्ण होऊन कोविडमुळे जादा मिळालेल्या वर्षात देखील त्यांना ‘एक अंकी व्याजदर आणि दोन अंकी डिव्हिडंड’ देता आला नाही. सभासदांचा विश्वासघात करणाऱ्या सत्ताधारी संचालकांविरुद्ध हे आंदोलन करण्यात येणार आहे.

    ते म्हणाले, “सत्ताधाऱ्यांनी जाहीर केल्याप्रमाणे कायम ठेव परत करावी आणि ताबडतोब दोन अंकी डिव्हीडंड द्यावा, या मागणीसाठी छत्रपती शाहू महाराज जयंतीपासून म्हणजे शनिवारपासून आंदोलनास सुरुवात होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून हजारो सभासद पत्रे पाठवून त्यांचा रोष व्यक्त करणार आहेत. कोरोनामुळे गेले वर्षभर दोन तीन महिन्यांचा कालावधी वगळता ५० टक्केच कर्मचारी बँकेचे कामकाज करतात. मग या आर्थिक वर्षाच्या नफ्यातून त्यांना बक्षीस पगाराची सुमारे ६२ लाख रुपयांची उधळण का केली. एवढ्या रकमेचा लाभांश सभासदांना वाढवून देण्याची गरज होती, असे अविनाश गुरव म्हणाले.

    हंबीरराव पवार, पोपट सूर्यवंशी, अरुण पाटील, शशिकांत माणगावे, तानाजी खोत, धनंजय नरुले, फत्तेसिंग पाटील, दगडू येवले, खाजांसो शेख, राजकुमार पाटील, अशोक महिंद्र उपस्थित होते.