तासगाव कोविड सेंटरमधील रुग्णांचे पैसे खासदारांनी परत करावेत; महादेव पाटील यांची मागणी

    सांगली : खासदार संजय पाटील यांच्या पुढाकारातून उभारलेल्या तासगाव कोविड सेंटरला वापरलेली साधनसामुग्री ही सरकारी होती. त्यामुळे या हॉस्पिटलमधल्या रुग्णांची घेतलेले ५० टक्के पैसे आधी खासदारांनी परत करावेत आणि त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील बाकी हॉस्पिटलचे हिशोब पाहावे. त्याचबरोबर या सेंटरचा मृत्यूदर २६ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने याची सखोल चौकशी करून सेंटरचे प्रवर्तक आणि संबंधित डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती पाटील यांनी दिली.

    महादेव पाटील म्हणाले, खासदार पाटील यांनी हे तासगाव कोविड सेंटर सुरू करताना आपल्या पदाचा वापर करून मोठ्या प्रमाणात लोक वर्गणीतून निधी उभा केला होता. कोविड सेंटरसाठी इमारत शासनाच्या मालकी असणाऱ्या महिला तंत्रनिकेतची वापरली होती. बेडसुद्धा महिला तंत्रनिकेतनचे वापरले होते. रुग्णालयासाठी लागणारी मशिनरी लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीतून घेतली होती. रुग्णालयासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग तासगाव नगरपालिकेने पुरवला होता.

    शहरातील डॉक्टरांनी याठिकाणी आपली सेवा बजावली आहे. असे असताना या रुग्णालयातील रुग्णाच्या नातेवाईकांकडून भरमसाठ बिले जमा करून घेतली आहेत. त्या बिलातील पन्नास टक्के रक्कम त्यांनी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना अगोदर परत करावी, असे आवाहन महादेव पाटील यांनी केले.

    खासदार पाटील यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या तासगाव कोविड सेंटरमध्ये १ जानेवारी ते आज अखेर २५४ रुग्ण उपचार घेत होते. त्यांपैकी ६७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आकडेवारीवरून हा मृत्यूदर अधिक असल्याने या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळाले नसल्याने या मृत्यूला जबाबदार धरून सेंटर प्रवर्तक आणि संबंधित डॉक्टर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

    आठ दिवसांत चौकशी करून कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, बेमुदत आंदोलन प्रसंगी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, प्रातांधिकारी मिरज, तासगाव तहसीलदार यांना देण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे, शहराध्यक्ष शरद शेळके उपस्थित होते.