
या खुर्ची प्रकरणाबाबत बाळू लोखंडे सांगतात “15 वर्षांपूर्वी भंगारात विकलेली खुर्ची मँचेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर सुस्थितीत असल्याचं पाहून समाधान वाटलं. या खुर्चीमुळे मला माझ्या जुन्या व्यवसायातील साहित्याची आठवण आली.” असं लोखंडे यांनी म्हटलं आहे.
सांगली जिल्ह्यातील सावळज येथील बाळू लोखंडे यांची भंगारात विकलेली खुर्ची थेट लंडनमध्ये पोहोचली आहे. जेष्ठ पत्रकार व क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतील ‘बाळू लोखंडे, सावळज’ या मराठीत लिहिलेल्या नावामुळे सुनंदन लेले यांनी कुतूहलापोटी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर खुर्च्यांच्या प्रवासाबाबत सर्वांनाच उत्सुकता वाढली होती.
मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील सावळजचे मंडप व्यावसायिक बाळू लोखंडे यांनी सुमारे तेरा वर्षांपूर्वी जुन्या खुर्च्या भंगारात विकल्या होत्या. ते भंगार इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर एका हॉटेल व्यावसायिकाने बाळू लोखंडे याच्या जुन्या खुर्च्यांची खरेदी केली. त्याच खुर्च्या सध्या मॅंचेस्टरच्या एका कॅफेत वापरल्या जातात.
Altrincham , Manchester che बाळू लोखंडे ??? आहे की नाही अजब pic.twitter.com/es5Jhe1sP6
— Sunandan Lele (@sunandanlele) September 23, 2021
या खुर्ची प्रकरणाबाबत बाळू लोखंडे सांगतात “15 वर्षांपूर्वी भंगारात विकलेली खुर्ची मँचेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर सुस्थितीत असल्याचं पाहून समाधान वाटलं. या खुर्चीमुळे मला माझ्या जुन्या व्यवसायातील साहित्याची आठवण आली.” असं लोखंडे यांनी म्हटलं आहे.
बाळू लोखंडे यांनी भंगारात विकलेल्या पंधरा खुर्चा वापरण्यायोग्य असल्याने मॅंचेस्टरच्या कॅफे मालकाने त्या पंधरा खुर्च्या खरेदी केल्या. त्या खुर्च्यांवर ‘बाळू लोखंडे, सावळज’ असे मराठीत लिहिले आहे. काही खुर्च्यांवरील रंग उडाला आहे. काही अक्षरेदेखील पुसली गेली आहेत. मँचेस्टरमध्ये जुन्या वस्तू आपुलकीने सांभाळल्या जातात. त्याच भावनेतून कॅफे मालकाने भंगारातून आणलेल्या जुन्या खुर्च्या आपल्या कॅफेत वापरासाठी ठेवल्या आहेत.