राष्ट्रवादीने नबाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा; शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी

मुंबई येथे क्रुझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी धाड घालून अंमली पदार्थांचे आंतराष्ट्रीय षडयंत्र उघडकीस आणले. यामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी समीर वानखेडे यांचा महत्वाचा वाटा आहे.

    सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी पोलीस आणि प्रशासनाच्या कामात हस्तक्षेप करु नये असे स्पष्टपणे सांगून देखील त्यांच्याच पक्षातील मंत्री नबाब मलिक सध्या एनसीबीने टाकलेल्या धाडीसंदर्भात हस्तक्षेप करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली. मलिक यांच्या कृतीविरोधात शहरातील मारुती चौकात याप्रश्नी निदर्शने करण्यात आली.

    मुंबई येथे क्रुझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी धाड घालून अंमली पदार्थांचे आंतराष्ट्रीय षडयंत्र उघडकीस आणले. यामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी समीर वानखेडे यांचा महत्वाचा वाटा आहे. मात्र त्यांच्यावर आणि परिवारावर खालच्या पध्दतीने टिका करण्याचे काम सध्या सुरु आहे. अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांनी काही संबंध नसताना वारंवार पत्रकार बैठका घेवून वानखेडे व त्यांच्या कुटुंबियांवर आरोप केले आहेत. वास्तविक ही पध्दत लोकशाहीत घातक आहे. अधिकाऱ्यांचे खच्चीकरण असेच सुरु राहिले तर भविष्यात कोणताच तपास अधिकारी प्रामाणिकपणे करु शकणार नाही. मंत्री मलिक यांच्यावर तपास कामात हस्तक्षेप केल्याबद्दल कलम ३५३, आयपीसी कलम १८६, ५००, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे द व्हिस्टल ब्लोअर्स प्रोटेक्शन ॲक्ट २०१४ या राज्यसभेत मंजूर झालेल्या कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच समीर वानखेडे यांच्या पाठीशी ठामपणे संघटना असल्याची भूमिका मांडण्यात आली.

    आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले, प्रकाश निकम, जयदीप चेंडके, प्रशांत गायकवाड, भूषण गुरव, सतीश खांबे, मोहन शिंदे, विकास सावंत, नितीन पवार, प्रशांत देसाई, जयदीप सदामते, प्रताप देशमुख, सागर खंडागळे, अक्षय रेपे आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.