भाजप प्रदेश सचिवपदी पृथ्वीराज पवार यांची निवड

पृथ्वीराज पवार हे केडरबेस युवा नेते आहेत. माजी आमदार संभाजी पवार यांनी बांधलेला शेतकरी, कष्टकरी, हमाल, तोलाईदार, भाजीपाला विक्रेत्यांसह सर्वसामान्यांचा गट त्यांनी पुन्हा बांधला आहे.

  सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : येथील माजी आमदार संभाजी पवार यांचे चिरंजीव, सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार (Prithviraj Pawar) यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ही निवड जाहीर केली. त्यांना राज्य पातळीवरील महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  विद्यमान पंतप्रधान व गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश झाला. जिल्ह्यात भाजपला मजबूत करण्याचे काम माजी आमदार संभाजी पवार यांनी केले. त्यामुळे भाजपने पृथ्वीराज पवार यांना राज्य पातळीवर संघटनात्मक जबाबदारी देऊन मोठा विश्‍वास व्यक्त केल्याची भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.

  पृथ्वीराज पवार हे केडरबेस युवा नेते आहेत. माजी आमदार संभाजी पवार यांनी बांधलेला शेतकरी, कष्टकरी, हमाल, तोलाईदार, भाजीपाला विक्रेत्यांसह सर्वसामान्यांचा गट त्यांनी पुन्हा बांधला आहे. सर्वोदय सहकार साखर कारखान्याच्या मालकी हक्काच्या न्यायालयीन लढ्यात यशस्वी लढा दिला, त्या माध्यमातून ही सर्व सामान्य तळागाळातील शेतकरी व सभासद कामगार यांच्याशी मजबूत विश्वास दायक वातावरण निर्माण केले. संभाजी पवार यांच्या निधनानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात अधिक वेळ दिला आहे.

  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या थेट प्रचारात सहभाग घेतला. मात्र, अधिकृत पक्षप्रवेश बाकी होता. विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पुन्हा भाजपमध्ये ताकदीने सक्रिय होण्याची सूचना केली. त्यानुसार त्यांच्या खांद्यावर प्रदेश सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  ‘‘भाजपचा विकासाचा विचार घेऊन आप्पांनी राजकारण केले. तोच आमचा वसा आणि वारसा आहे. देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रकांतदादा यांनी राज्य पातळीवर जबाबदारी दिल्याने आता उत्साहात काम करू. जिल्ह्यातील सर्वच भाजप नेते, कार्यकत्यांनीशी माझा स्नेहभाव आहे. एकदिलाने पक्ष मजबूत करू.’’

  – पृथ्वीराज पवार