…तर भरचौकात फाशी घ्यायला तयार : दिलीप पाटील

  सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची (Sangli District Central Bank) यापूर्वी ईडीसह विविध तपास संस्थांनी चौकशी करून झाली आहे. त्यामध्ये बँकेचा कारभार पारदर्शक असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मी काही कारखान्यांची कर्ज माफ केली असल्याची अफवा पसरवत आहे, अशाप्रकारे मी कोणाचेही कर्ज माफ केलेलं नाही, तसं केलं असेल तर मी भरचौकात फाशी घेण्यास तयार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील (Dilip Patil) यांनी व्यक्त केलं.

  सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ९४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. २९ रोजी ऑनलाईन पार पडली, या सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष संग्राम देशमुख, जेष्ठ संचालक आमदार मोहनराव कदम, डॉ.प्रताप पाटील, गणपती सगरे, चंद्रकांत हाक्के, सी.बी.पाटील, बाळासाहेब होनमोरे, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंतराव कडू आदी उपस्थित होते.

  आरोप चुकीचे

  सरफेसी कायद्यांतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, कंपनी, महिला बचत गट यांचे ६० कोटींचे कर्ज निर्लेखन केल्याचा आरोप काहींनी केला आहे. हे आरोप करणारे असे लोक आहेत, ज्यांच्या मागे त्याचे घरचे सुद्धा नाहीत, केवळ कोणाची तरी सुपारी घेऊन हे लोक बँकेची बदनामी करण्याचे काम करतात, करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सभासदांना सांगितले.

  शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

  यापूर्वी आमच्याच संचालक मंडळाने ३ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची पद्धत सुरू केली होती, आता त्यामध्ये वाढ करून आम्ही ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज तर नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांना व्यजात एक टक्का सवलत देणार असल्याची घोषणा दिलीप पाटील यांनी केली.

  कारखाने ज्यांनी स्थापन केले त्यांनाच मिळावेत

  कारखान्यांची कर्ज निर्लेखन केल्याचे आरोप चुकीचे आहेत, सर्व कारखाने दुष्काळ व इतर करणांनी अडचणीत आले आहेत. कारखान्यांनी सर्व कर्ज रक्कम भरण्याची तयारी दाखवली आहे, केवळ व्याजाचे हप्ते मागितले जात आहेत, त्यामुळे त्यांना कोणीही गुन्हेगारा प्रमाणे पाहू नये, किंवा आम्ही देखील बँकेत कोणताही चुकीचा निर्णय घेतला नाही, केवळ जे कारखाने स्थापन करण्यात ज्यांची महत्वाची भूमिका आहे, त्यांनाच ते मिळावेत अशी आमची प्रामाणिक भूमिका असल्याचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी सांगितले.