लुटारू डॉक्टरांविरोधात सांगलीचे खासदार उतरले मैदानात

    सांगली : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी सांगली जिल्ह्यातील संख्या अद्याप कमी झाली नाही. दरम्यान, दुसऱ्या लाटेत काही डॉक्टरांनी बेकायदेशीरपणे अव्वाच्या सव्वा बिल लावून कोरोनाबाधित रुग्णांना लुटल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशाप्रकारच्या तक्रार निवारण्यासाठी आता सांगलीचे खासदार संजयकाका पाटील मैदानात उतरले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

    खासदार पाटील म्हणाले, “कोरोनामध्ये आधीच सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यात काही रुग्णालयांनी कोरोनाचा धंदा मांडला आहे. इंजेक्शन, ऑक्सिजन बेड आणि इतर सुविधांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त वसुली रुग्णालयांनी केली आहे. अशा डॉक्टरांची माहिती, तक्रारी ऑडिट रिपोर्ट गोळा करून लवकरच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. लुबाडणूक केलेली आढळल्यास अशा रुग्णालयांकडून ही रक्कम वसूल करून त्या रुग्णांना परत करणार आहे.

    कोविड रुग्णालयात कोणाकडून चुकीच्या पद्धतीने व शासकीय बिलाव्यतिरिक्त रक्कम वसूल केली असल्यास अशा डॉक्टर, मेडिकल आणि लॅबची माहिती नागरिकांनी 9699241554 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन खासदार पाटील यांनी केलं आहे.