सांगली महापालिकेच्या शाळा इंग्रजी माध्यमांना तोड देणाऱ्या; महेश चौथे यांचे गौरवोद्गार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा या इंग्रजी माध्यमांना तोड देणाऱ्या ठरत आहेत. यामुळे महापालिका शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे, असे गौरोवोद्गार शिक्षण विभागाचे कोल्हापूर विभागीय उपसंचालक महेश चौथे (Mahesh Chauthe) यांनी काढले आहेत.

    सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा या इंग्रजी माध्यमांना तोड देणाऱ्या ठरत आहेत. यामुळे महापालिका शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे, असे गौरोवोद्गार शिक्षण विभागाचे कोल्हापूर विभागीय उपसंचालक महेश चौथे (Mahesh Chauthe) यांनी काढले आहेत. यावेळी चोथे यांनी महापालिकेची मॉडेल शाळा असणाऱ्या शाळा क्रमांक 23 ला सदिच्छा भेट देत शाळेचे कौतुक केले. तसेच मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी महापालिका शाळांच्या दर्जात्मक सुधारणेसाठी सुरू केलेल्या प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले.
    सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळांच्या दर्जात्मक विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीबरोबर पट वाढीसाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यातून मनप शाळा इमारतीपासून ते आवार सुशोभित करण्याबरोबर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शाळा या सध्या खासगी इंग्लिश मीडियम शाळांशी स्पर्धा करत आहेत.
    महापालिकेच्या अनेक शाळा या खासगी शाळांच्याही पुढे आपला दर्जा राखून आहेत. त्यामुळे मागील वर्षभरात महापालिका शाळांकडे 700 विद्यार्थी वाढले आहेत. यापैकी आयुक्त नितीन कापडणीस यांनी शाळा क्रमांक 23 ही एक मॉडेल शाळा म्हणून विकसित केली. आज या मॉडेल शाळेला कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी सदिच्छा भेट देत शाळेचे आणि उपक्रमांचे तसेच स्वच्छतेचे कौतुक केले. यावेळी शाळा वर्ग आणि आवाराचीसुद्धा चोथे यांनी पाहणी केली. यावेळी मुख्याध्यापिका ममता नायकुडे यांनी विद्यार्थ्यांकडून इंग्लिशमधून विविध कलांचे सादरीकरण करून दाखवले. या शाळेच्या भेटी नंतर उपसंचालक महेश चोथे यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले. तसेच शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेसाठी तयार ठेवण्याच्या सूचना केल्या.
    यावेळी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी पोपट मलगुंडे, लेखापाल गजानन बुचडे, कनिष्ठ अभियंता मंदार कारंडे, केंद्र समन्वयक रवींद्र शिंदे, संदीप सातपुते, मारुती माळी, शाळेच्या मुख्याध्यापक ममता नायकुडे, दीपाली वास्ते, उज्वल साठे, नजमुनींसा शेख, विशाल भोंडवे आदी उपस्थित होते.