सांगली, मिरजेत कोरोनाचे सीरो सर्वेक्षण

    सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना अंतर्गत चौथे सीरो सर्वेक्षण होणार आहे. ‘आयसीएमआर’चे पथक २५ जून रोजी सांगली, मिरजेत सिरो सर्वेक्षण करणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली.

    ताटे म्हणाले की, महापालिका क्षेत्रात मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे आणि मिरज उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोरोना नियंत्रणासाठी महापालिका आरोग्य यंत्रणेने प्रयत्न केले आहेत. सध्या महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी धोका कायम आहे.

    आयसीएमआरचे पथक २५ जून रोजी सांगली, मिरजेतील काही निश्चित केलेल्या ठिकाणी नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार आहेत. या सर्वेक्षणातून महापालिका क्षेत्रात कोविड परिस्थिती काय आहे. याची माहिती घेतली जाणार आहे. या सीरो सर्वेक्षणसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. रवींद्र ताटे यांनी केले.