बेळगाव-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करा; राष्ट्रवादीच्या सुरेश पाटील यांची मागणी

    सांगली : बेळगावमधून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने बेळगाव-मिरज-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी. बंगळूर नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस मिरज-पंढरपूर दौंड मार्गे सोडावी, तसेच बंगळूर-बेळगाव व म्हैसूर धारवाड गाडीचा मिरजपर्यंत विस्तार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्याकडे केली.

    उपमुख्यमंत्री सवदी यांना दिलेल्या निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, बेळगाव, कुडची, शेडबाळ येथील अनेक प्रवासी विविध कामांसाठी मिरजेत येतात किंवा पुण्याला जातात. या बहुसंख्य प्रवाशांना कुर्ला, निजामुद्दीन इत्यादी गाड्यांनीच प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागामार्फत बेळगाव-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस तातडीने सुरू करावी. इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू केल्यास बेळगाव, मिरज, सातारा, पुणे इत्यादी स्थानकांमधून मिळणारा महसूल हुबळी विभागाला मिळू शकतो. तसेच प्रवाशांची देखील सोय होऊ शकते.

    सध्या धावणारी बंगळूर-नवी दिल्ली राजधारी एक्स्प्रेस बेळगाव, मिरज, पंढरपूर, दौंड मार्गे वळविण्यात यावी. त्यामुळे या भागातून उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांना सोय होईल. तसेच बेळगाव-बंगळूर आणि धारवाड-हुबळी या गाड्यांचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात यावा. तसेच कर्नाटकातून मिरजपर्यंत धावणाऱ्या गाड्यांचा कोल्हापूरपर्यंत विस्तार करावा, अशीही त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

    मिरज रेल्वे विभाग करण्याची गरज

    मध्य आणि दक्षिण-पश्चिम रेल्वेला जोडणारे मिरज रेल्वे जंक्शन हे अत्यंत महत्त्वाचे जंक्शन आहे. सुरुवातीला हुबळी विभागात असणारे मिरज जंक्शन आता पुणे विभागात आहे; परंतु पुणे विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर अथवा मिरजेतून नवीन गाडी सुरू करण्यात आलेली नाही. तसेच पुण्यापर्यंत धावणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्यांचा विस्तारदेखील मिरजेपर्यंत केलेला नाही. त्यामुळे मिरज जंक्शन पूर्ववत दक्षिण-पश्चिम रेल्वेला जोडून मिरज रेल्वे जंक्शनचे मिरज विभागामध्ये रूपांतर करण्यात यावे, असेही सुरेश पाटील यांनी सांगितले.