ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक रुपयाही बुडवणार नाही : खासदार संजय पाटील

  सांगली : तासगाव आणि यशवंत साखर कारखान्याला घातलेल्या ऊसाचा शेतकऱ्यांचा एकही रुपया बुडवणार नाही, को जनरेशन आणि डिस्लरी प्लँट उभा करण्यासाठी झालेल्या आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचे पैसे देण्यास विलंब झाला. मात्र, दहा दिवसांत शेतकऱ्यांची बिले अदा करू, असे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  जिल्ह्यातील तासगाव आणि यशवंत साखर कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिल दिलेली नव्हती, या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खासदार पाटील यांच्या कार्यालयावर शेतकऱ्यांसह हल्लाबोल केला होता. तर सोमवारी खासदार पाटील यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला होता. तत्पूर्वी या आंदोलनाची दखल घेऊन खासदार पाटील यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले.

  खासदार पाटील म्हणाले, ‘सध्या साखर उद्योग प्रचंड अडचणीत आहे. त्यात ज्या करखान्यांकडे उपपदार्थ निर्मिती प्रक्रिया होत नाही, त्यांना कारखानदारी परवडत नाही. मात्र, आपण ग्रामीण भागात कारखाने बंद पडल्याने विकास थांबला होता. तो रुळावर आणण्यासाठी हे कारखाने सुरू केले आहेत. परिस्थिती सुधारण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे’.

  तासगाव साखर कारखान्यात आम्ही ३.५ एमएलडी क्षमतेचा डिस्लरी प्लांट आणि १६ मेगा व्हॉट क्षमतेचा कोजनरेशन प्लँट सुरू करीत आहोत. त्यानंतर आमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. यासाठीच आम्ही यातील काही रक्कम बँकेकडे ठेवून बँक कर्जे मागणी केली होती. मात्र, त्याला काही कारणांनी यश आले नाही, आता लवकरच दुसऱ्या बँकांनी याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचा एकही रुपया बुडवणार नाही, सर्वांचे पैसे आम्ही दहा दिवसात देणार आहोत.

  राईस मिल स्वकष्टाची

  खासदार पाटील यांनी उत्तर प्रदेशमध्ये कारखान्याच्या साखरेवर कर्ज उचलून राईस मिल घेतल्याचा आरोप झाला होता. यावर विचारले असता ते म्हणाले, राईस मिल घेतल्या आहेत, हे खरे आहे. मात्र, त्या स्वकष्टावर घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले.