Sangali News : सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीला स्थगिती ; सहकार व पणन विभागाचे आदेश  

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनावश्यकपणे ३० ते ४० कोटी रुपये खर्च केल्याची तक्रार फत्तेसिंह नाईक आणि सुनील फराटे यांनी सहकार विभागाकडे केली होती. बँकेचे इमारत बांधकाम, मुख्य कार्यालय आणि शाखांमधील फर्निचर खरेदी, एटीएम मशीन, पैसे मोजण्याचे मशीन, इत्यादी बाबींवर, आवश्यकता नसताना सुमारे ३० ते ४० कोटींचा खर्च केल्याचा तक्रारदार यांचा आरोप होता

    सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कक्ष अधिकाऱ्यांनी दिले होते. १४ सप्टेंबरला काढलेला आदेश ९ दिवसात स्थगित करण्यात आला आहे. कक्ष अधिकारी सरोज पावसकर यांनी गुरुवारी स्थगिती आदेश काढला. बँकेतील चौकशीचा आदेश अवघ्या नऊ दिवसात स्थगित केल्याने याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

    सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनावश्यकपणे ३० ते ४० कोटी रुपये खर्च केल्याची तक्रार फत्तेसिंह नाईक आणि सुनील फराटे यांनी सहकार विभागाकडे केली होती. बँकेचे इमारत बांधकाम, मुख्य कार्यालय आणि शाखांमधील फर्निचर खरेदी, एटीएम मशीन, पैसे मोजण्याचे मशीन, इत्यादी बाबींवर, आवश्यकता नसताना सुमारे ३० ते ४० कोटींचा खर्च केल्याचा तक्रारदार यांचा आरोप होता. यानुसार कक्ष अधिकारी सरोज पावसकर यांनी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून अहवाल देण्याचे आदेश सहकार विभागाला दिले होते.

    चौकशीला सुरुवात होण्यापूर्वीच कक्ष अधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढून चौकशीला स्थगिती दिली आहे. शिवाय तक्रारीबाबत त्यांनी बँकेचा खुलासाही मागवला आहे. १४ सप्टेंबरला काढलेला आदेश पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक तडजोड करून चौकशीला स्थगिती आणल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

    जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे. आजपर्यंत पारदर्शकपणे कारभार केला आहे. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. यापूर्वीही अनेक चौकशा झाल्या आहेत. मात्र, त्यामध्ये काही निष्पन्न झाले नाही. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दृष्टिकोनातून चौकशी लावण्यात आली होती. बँकेच्या हितासाठी चौकशीला स्थगिती देण्यात आली आहे.

    - दिलीपराव पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक