…तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढू; जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

महाविकास आघाडी तुटावी, असा त्याचा काही भाग असेल असे वाटत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट येणार नाही, याची आम्हाला खात्री असल्याचा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

    सांगली : राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत आणि एकत्रितच निवडणुका लढवल्या जातील. पण जर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात तसे काँग्रेस शेवटपर्यंत स्वबळावर लढण्याचा जर आग्रह धरला तर मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित अशा कोणत्याही गोष्टीला सामोरे जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

    जयंत पाटील म्हणाले, ‘शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वितुष्ठ येणार नाही. याची आम्हाला खात्री आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. परंतु काँग्रेसने जर शेवटपर्यंत स्वबळाचा जागर धरला. तर शिवसेना आणी राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे. प्रताप सरनाईक हे महाविकास आघाडी टिकावे या मताचे आहेत, असे मी खासगीत ऐकले आहे. परंतु, त्यांनी मुख्यमंत्री यांना काय पत्र लिहिले हे माहित नाही.

    दरम्यान, महाविकास आघाडी तुटावी, असा त्याचा काही भाग असेल असे वाटत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट येणार नाही, याची आम्हाला खात्री असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.