Bribe

    सांगली : माडग्याळ (ता. जत) येथील तलाठी विशाल विष्णू उदगिरे (वय ३७, रा. कसबे डिग्रज) हा २ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी या रकमेची मागणी केली होती. लाचेची रक्कम संख (ता. जत) येथील अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. म्हेत्रे हे फरार झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदार हे त्यांच्या वाहनामधून माती वाहतूक करतात. त्यांची वाहने म्हेत्रे व उदगिरे यांनी अडवून कारवाईसाठी संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून लावली होती. या वाहनांवर कारवाई न करण्याकरिता व वाहने सोडण्याकरिता म्हेत्रे आणि उदगिरे यांनी तक्रारदार यांच्याकडे अडीच लाख रुपये रुपये लाचेची मागणी केली होती.

    संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी सापळा लावला होता. म्हेत्रे यांच्या सांगण्यावरून २ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी उदगिरे याला रंगेहात पकडण्यात आले. त्यावेळी म्हेत्रे हे फरार झाले.

    दरम्यान, पथकाने म्हेत्रे आणि उदगीरे यांच्याविरुध्द उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलिस उपायुक्त सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाने पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलिस निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, अविनाश सागर, अजित पाटील, संजय संकपाळ, राधिका माने, संजय कलगुटगी, रविंद्र धुमाळ, सलीम मकानदार, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, श्रीपती देशपांडे, भास्कर भोरे, सीमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली.