जळीतग्रस्त पारधी कुटुंबाला घर बांधून देणार : संदेश भंडारे

  तासगाव / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सावर्डे (ता.तासगाव ) येथील जळीतग्रस्त पारधी कुटुंबाच्या घराचे उद्यापासून बांधकाम सुरु करणार आहे. घर जाळणाऱ्या नराधमांना सोडणार नाही, असा इशारा आरपीआय लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेश भंडारे (Sandesh Bhandare) यांनी दिला.

  रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पीडित कुटुंबाला मदत म्हणून कपडे, अन्नधान्य, भांडी संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रविण धेंडे, युवा तालुकाध्यक्ष जयेश कांबळे, तुकाराम सदाकळे उपस्थित होते.

  ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या रामभरोसे कारभारमुळे हा प्रकार घडला. याची सखोल चौकशी करावी, भटक्या विमुक्त जातीतील पाराध्यांच्या पाठीशी कोणी नाही, असे पोलिसांनी समजू नये आणि प्रशासनानेसुद्धा दिरंगाई करू नये, विस्थापितांना वेगळा आणि प्रस्थापितांना वेगळा कायदा नाही. चौकशी व मदतीला विलंब लावणारे अधिकारी व सरपंच, आमदार, खासदार आहेत हे पाहिले जाणार नाही. सर्वांनाच आरोपीच्या पिंजाऱ्यात उभे करू, असे मत संदेश भंडारे यांनी व्यक्त करत या जळीत घटनेचा निषेध केला.

  लोकप्रतिनिधी पीडितांना भेटत सुद्धा नाहीत. ही शरमेची बाब आहे. पुरोगामीत्वाचे ढोल बडवणारे राज्य सरकार मागासवर्गीय भटक्या समाजाला न्याय देत नसून सत्ताधाऱ्यांचेच गावगुंड घरे जाळत आहेत. पारधी कुटुंबातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष आंदोलन करेल, वेळ पडली तर प्रशासनाला धारेवर धरेल, अशी माहिती आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष प्रविण धेंडे यांनी दिली.

  ग्रामपंचायत प्रशासन व बाकीचे पुढारी काय करत आहेत ते बघितले जाईल, मोठ्या धनिकाचे, पुढाऱ्याचे घर फोडले, जाळले असते तर श्वानपथक, पोलीस यंत्रणा फोर्स तपासासाठी धाय मोकळून पळाले असते पण गरिबाला कोणी वाली नाही हे या घटनेतून सिद्ध झाले आहे, याचा जाब ही विचारला जाईल असे प्रविण धेंडे म्हणाले.

  अन्यायग्रस्त पारधी समाजाच्या जगनू पवार व त्यांच्या कुटुंबाला संदेश भंडारे यांच्या हस्ते धान्य व संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष दिनेश डावरे, मनोज धेंडे, धीरज कांबळे, कैलास चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

  सत्ताधारी गावगुंडांनी ही घरे जाळली असल्याचा आरोप

  सावर्डे गावात राष्ट्रवादी व शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आहेत. तर, भाजपचे विधानसभा अध्यक्ष आहेत. गावातील सत्ताधारी गावगुंडानी ही घरे जाळली आहेत, त्याच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत. वेळ पडली तर पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावर पण गुन्हे दाखल करू, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सरपंच ग्रामसेवक यांची चौकशी करण्यात येईल. पिढीत पारधी कुटुंबाला जाळून मारण्याचा कट करणारे नराधम पोलिसांनी जेलमध्ये टाकावेत, असे संदेश भंडारे म्हणाले.