सांगलीत भाजप जिल्हाध्यक्षांच्या मतदारसंघात खिंडार; नितीन नवलेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

    सांगली : भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याच मतदारसंघात भाजपला खिंडार पडले. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांचा मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार अरुण लाड यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करण्यात आला.

    भाजपकडून नितीन नवले हे अंकलखोप गटातून जिल्हा परिषदेला चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे आणि महापुरात केलेल्या कामामुळे त्यांना जनमत होते. पण पक्षातील अंतर्गत कुरघुड्यामुळे त्यांना नेहमी त्रासाला सामोरे जावे लागत होते. काही दिवसांपूर्वी औदुंबर येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटपाच्या कार्यक्रमात नितीन नवले राष्ट्रवादीच्या स्टेजवर दिसून आले. तेव्हापासून त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरूच होती.

    त्यांनी आज मनोज नवले, सुशांत सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश केल्याने पलूस तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढल्याने आमदार अरुण लाड यांच्या गटात उत्साहाचे वातावरण तर आहेच शिवाय एक निष्कलंक चेहरा पक्षाला मिळाल्याने येणाऱ्या निवडणुका सुकर होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.